मिलन सबवे येथील रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलासाठी ४५० टन वजनाचा पोलादी सांगाडा बसवण्यात आला आहे. लवकरच अशाच प्रकारचा आणखी एक ४५० टन वजनाचा सांगाडा बसवण्यात येणार असून त्यामुळे पावसाळय़ापूर्वी हा उड्डाणपूल तयार करण्याचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
मिलन सबवे येथे दर पावसाळय़ात पाणी साठून वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी येथील रेल्वे मार्गावर उड्डाणपूल बांधण्याचा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतला. हा ७०० मीटर लांबीचा उड्डाणपूल सांताक्रूझ येथील रेल्वेमार्ग ओलांडून जाणार असून त्यासाठी एकूण  ८३ कोटी ७४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
उड्डाणपुलाच्या बांधकामात रेल्वेमार्गावरील पट्टय़ाचे बांधकाम करण्यासाठी हा पोलादी सांगाडा बसवण्याचे काम अत्यंत महत्त्वाचे होते. ४५० टन वजनाचा हा पोलादी सांगाडा बीदर येथे तयार करण्यात आला व मुंबईत आणून तो जुळवण्यात आला. रेल्वे आणि प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी एकत्रपणे काम करत तो बसवला, असे प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.
तर १२ मीटर रूंदीचा व ६१ मीटर लांबीचा हा पोलादी सांगाडा दोन रेल्वेमार्गादरम्यान उभारण्यात आलेल्या खांबांवर खास तयार करण्यात आलेल्या ‘रोलर’च्या मदतीने खेचून बसवण्यात आला, अशी माहिती प्राधिकरणाचे मुख्य अभियंता शरद सबनीस यांनी दिली.