भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर कारवाईच्या भीतीने कुकरीने हल्ला करणा-या लक्ष्मण सत्याप्पा ढेंबरे (वय २१, रा. बैलबाजार रोड, कराड) या युवकास अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. ए. एन. पाटील यांनी ५ वष्रे सक्तमजुरी व ५ हजार दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी अन्य चौघा संशयितांची या खटल्यातून मुक्तता करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबर २०१० रोजी घडलेल्या या घटनेत अमित विठ्ठल पवार हे पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाले होते.
३० नोव्हेंबरला रात्री लक्ष्मण ढेंबरे, जगदीश हिप्पलगार, सागर सूर्यवंशी, दिवाकर गाडे आणि बाबासाहेब सूर्यवंशी या पाचजणांवर युवराज पाटील यांच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तत्पूर्वी रात्री ९ च्या सुमारास वरील पाचजणांची अजंठा हॉटेलजवळ भांडणे सुरू होती. हा प्रकार सज्जन जगताप व अमित पवार यांनी पाहिला. त्यांनी ताबडतोब कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेतील आपले सहकारी युवराज पाटील व अन्य कर्मचा-यांना घटनास्थळी बोलावले. त्यानंतर ते सर्वजण घटनास्थळी पोहचल्यानंतर आम्ही पोलीस आहोत भांडणे सोडविण्यासाठी आलो आहोत असे सांगूनही लक्ष्मण ढेंबरे यांने आपल्याजवळील कुकरीने अमित पवार यांना ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. यात पवार यांच्या पोटावर गंभीर दुखापत झाली होती.
या घटनेनंतर पाचजणांवर खुनाचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणत मारहाण करणे, बेकायदा जमाव जमवून जिल्हाधिका-यांच्या शस्त्रबंदीचे उल्लंघन करणे अशा विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र दखल करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी कराडच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. आत्माराम पाटील यांनी ९ साक्षीदार तपासले. यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसोबत सहायक पोलीस निरीक्षक विकास धस, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.