‘कोड वर्ड’ गुप्त असतो. तो ठरावीक लोकांनाट माहीत असतो. पण तो जर इतरांना कळला तर मोठा अनर्थ होऊ शकतो. मस्जिद बंदर येथे आंगडियाचा व्यवसाय करणाऱ्या श्रीकांत राऊत यांना कोडवर्ड फुटल्याचा मोठा फटका बसला. कोडवर्ड फुटल्याने त्यांच्या कार्यालयात तब्बल ५० लाखांची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. मस्जिद बंदरच्या काझी सैय्यद स्ट्रीट या गजबजलेल्या बाजारपेठेत योगेश्वर इमारतीमध्ये राऊत यांचे कार्यालय आहे. आंगडियाचा त्यांचा व्यवसाय असल्याने त्यांच्या कार्यालयात दररोज लाखोंची उलाढाल होत असते. त्यामुळेच त्यांच्या कार्यालयात प्रवेश करण्यासाठीचा एक ठरावीक कोडवर्ड आहे. हा कोडवर्ड होता ‘हैदराबाद’. हा कोडवर्ड सांगितला तरच कार्यालयात प्रवेश मिळत असे. म्हणजे ज्याने कुणी हा कोडवर्ड सांगितला ती व्यक्ती या व्यवसायाशी संबंधित आणि परिचयाची असेल असे गृहीत धरून प्रवेश दिला जात असे. याच भागात शांतीप्रसाद यादव हा तरूण एका दुकानात काम करीत असे. राऊत यांच्या कार्यालयात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते आणि इथे येणारे व्यापारी आत जाताना ‘हैदराबाद’ हा कोडवर्ड सांगून आत प्रवेश मिळवतात हे त्याला माहीत होते. आपणही जर हा कोडवर्ड सांगितला तर आत प्रवेश मिळेल हे त्याला समजले आणि तेथेच त्याच्या मनात सैतानी विचार सुरू झाले. त्याने मग आपल्या काही साथीदारांना हाताशी घेऊन राऊत यांचे कार्यालय लुटण्याची योजना बनवली. त्याला या परिसराची माहिती होती. इथे येणारे लोक, पळून जाण्याचे रस्ते आदीचा अभ्यास केला. सोबतीला त्याने मसुद शेख (३२), मुश्तकिन खान (२८),अशोक नायक (३२) या साथीदारांना सोबत घेतले. २३ मार्च २०१३ रोजी दुपारी यादव आपल्या साथीदारांसह कार्यालयात गेला. तेथे हैदराबाद हा कोडवर्ड सांगितला आणि सहज प्रवेश मिळाला. मग त्यांचे काम अधिकच सोपे झाले. या चौघांनी गावठी पिस्तुल,चॉपरचा धाक दाखवून राऊत यांच्या कार्यालयातील ५० लाख रुपये लुटून नेले.
साथीदारांनाच फसवले
कार्यालय लुटल्यानंतर चौघे वेगवेगळ्या ठिकाणी फरार झाले होते. ज्याच्याकडे रकक्म होती त्याने केवळ २० लाख रुपये लुटीत मिळाल्याचे इतरांना सांगितले. दुसऱ्या दिवशी जेव्हा ५० लाखांचा दरोडा पडला हे त्यांनी वर्तमानपत्रात वाचले तेव्हा त्यांना साथीदाराने फसविल्याचे लक्षात आले.
याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा २ ने तपास करून या चौघांना लोअर परळ, अॅण्टॉप हिल, मस्जिद बंदर येथून अटक केली. गुन्हे २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजे, पोलीस निरीक्षक मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम, आजगावकर, कवठेकर आदींनी या लुटीचा तपास लावून आरोपींनी अटक केली. सध्या या आरोपींनी पुढील तपासासाठी पायधुनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2013 रोजी प्रकाशित
अंगडियाला गंडविले..
‘कोड वर्ड’ गुप्त असतो. तो ठरावीक लोकांनाट माहीत असतो. पण तो जर इतरांना कळला तर मोठा अनर्थ होऊ शकतो. मस्जिद बंदर येथे आंगडियाचा व्यवसाय करणाऱ्या श्रीकांत राऊत यांना कोडवर्ड फुटल्याचा मोठा फटका बसला. कोडवर्ड फुटल्याने त्यांच्या कार्यालयात तब्बल ५० लाखांची चोरी झाल्याचे उघड झाले आहे.
First published on: 20-04-2013 at 12:18 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 50 lakh robbery in angdiya office