अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण व रोजगार आदी विविध पायाभूत प्रश्नांकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माकपने बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी जेलभरो आंदोलनात सोलापुरात माकपच्या पाचशेपेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी स्वत:ला अटक करून घेतली. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात पोलिसांनी आडम मास्तर यांच्यासह ३७५ पुरुष व १५० महिला कार्यकर्त्यांना अटक केली. या सर्वाना पोलीस मुख्यालयात हलविण्यात आले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर आंदोलकांनी जामीन नाकारण्याचा पवित्रा घेतला. तशी घोषणा आडम मास्तर यांनी यापूर्वीच केली होती.
सकाळपासून माकपचे कार्यकर्ते जथ्याजथ्याने जिल्हाधिकारी कार्यालयोसमोर जमा होत गेले. दुपारी आंदोलन सुरू होत असताना आडम मास्तर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कामगार व सामान्यांच्या विरोधातील धोरणावर कडाडून हल्ला चढविला. या वेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता. गोरगरिबांना दरमहा दोन किलो दराने ३५ किलो धान्य द्यावे, महागाई रोखावी, भ्रष्टाचारावर कडक भूमिका घेऊन पायबंद घालावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन हाती घेण्यात आल्याचे आडम मास्तर यानी सांगितले. या वेळी एच. एच. शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, नगरसेवक माशप्पा विटे, शकुंतला पाणीभाते,  शेवंता देशमुख, नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, प्रभाकर तेलंग, मेजर युसूफ शेख आदी कार्यकर्त्यांचा अटक करून घेणाऱ्यात समावेश होता.