कृषिमंत्री विखे यांचा पाठपुरावा
नगर-मनमाड राज्यमार्गावरील कोल्हार ते कोपरगाव दरम्यान उखडलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ८० लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून हे पैसेही संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नाने हा निधी उपलब्ध झाला.
दरम्यान, कोल्हार ते कोपरगाव दरम्यान या मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाल्याने स्थानिक नागरिकांसह साईभक्तांनीही याबाबत समाधान व्यक्त केले. कोल्हार ते कोपरगाव राज्यमार्गाच्या दुरावस्थेबाबत मंत्री विखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मुखर्जी यांना प्रत्यक्ष भेटून या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी केली होती. रस्त्याच्या चौपदरीकरणाचे कामही हाती घेण्याची सूचना केली हाती.
नगर ते कोल्हार या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, कोल्हार ते कोपरगाव हे ५५ किलोमीटरचे काम रखडल्याने या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथे अपघातांचेही प्रमाण प्रचंड वाढले. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी खास बाब म्हणून निधी मंजूर करून घेण्यासाठी विखे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. हा निधी वर्गही झाल्याने रस्त्याच्या दुरूस्तीची कामेही लगेचच सुरू झाली आहेत.
महिनाभरात चौपदरीकरणाला प्रारंभ
कोल्हार-कोपरगाव मार्गाचे चौपदरीकरणाचे काम येत्या एका महिनाभरात सुरूकरण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मुखर्जी यांनी दिल्याचे विखे यांनी सांगितले. खासगीकरणातून होणाऱ्या चौपदरीकरणाच्या कामातील तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या आहेत. शिर्डी बायपाससह महिनाभरात या कामाचा शुभारंभ होईल.