पंजाबी ‘गुरू’ प्रकरण भोवले,  धडा केव्हा घेणार?
बंटी-बबलीने गुंतवणूकदार, व्यापारी आणि उद्योजकांची फसवणूक केल्याच्या घटना उघडकीस येत असतानाही सावधानता न बाळगल्याने एका व्यापाऱ्याची  तब्बल ९३ लाखांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात बंटी-बबलीसह जसमितकौर पुरी, रवींद्रसिंग पुरी आणि तिची आई सरणजितसिंग कौर यांच्यासह जसमितचा मित्र अर्जुनदीप हरप्रितसिंग सिंदुरिया यांना अटक करण्यात आली. जसमितसिंग बलदेवसिंग सबरवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सबरवाल यांचे गड्डीगोदाममध्ये वाहनाच्या स्पेअर पार्ट्सचे दुकान आहे. त्यांच्या मुलीचा विवाह होत नसल्यामुळे ते गेल्या अनेक दिवसापासून चिंतेत होते. मुलीच्या लग्नासाठी त्यांची धडपड सुरू होती. ऑगस्ट २०११ मध्ये पंजाबातील एका गुरूला भेटायला गेले होते. गुरुने त्यांना आर्शीर्वाद देत लवकरच मुलीचा विवाह होईल, असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या मोबाईलवर जसमितने संपर्क साधून ‘मी गुरूची मुलगी बोलत आहे, गुरुंना पैशाची गरज आहे, असा निरोप दिला. ती सबरवाल यांच्या घरी आल्यावर आणि तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत सबरवाल यांना आधी तिला २० लाख रुपये दिले. त्यानंतर परत जसमितने मित्र अर्जुनदीप यांच्या मदतीने सबरवाल यांच्याकडून दहा लाख आणि नंतर पाच लाख रोख घेतले. सबरवाल यांनी दिल्लीला जाऊन अर्जुनदीप व जसमितला पैसे दिले. त्यानंतर बँकेच्या खात्यात काही रक्कम टाकली. असे एकूण ९३ हजार लाख रुपये सबरवाल यांनी बंटी- बबलीला दिले.  त्यानंतरही मुलीचे लग्न न जुळल्याने सबरवाल यांना संशय आला. त्यांनी लगेच गुरुंशी संपर्क साधला. त्यावेळी गुरू दिल्लीला होते. त्यामुळे सबरवाल तात्काळ दिल्लीला गेले आणि त्यांनी गुरुची भेट घेऊन झालेली घटना सांगितल्यावर तुमच्या मुलीने माझ्याकडून लाखो रुपये घेतल्याचे सांगितले. मात्र गुरुचा त्यांच्या मुलीवर विश्वास असल्याने त्यांनी दोन्ही मुलींना सबरवालांसमोर उभे केले. त्यापैकी एकीनेही सबरवाल यांच्याकडून पैसे घेतले नसल्याचे सांगितले. त्यामुळे सबरवाल यांनी आलेले मोबाईल आणि एसएमएस कोणी पाठवले अशी विचारणा करताच त्यांनी काहीच माहीत नसल्याचे सांगितले. सबरवाल लगेच नागपूरला आले आणि त्यांनी पाचपावली पोलीस ठाण्यात याची तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून ठाणेदार प्रकाश बेले यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक विशाल नांदे या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. पुढील तपासासाठी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.