सकाळी सात वाजल्यापासूनच प्रमुख उमेदवारांचे बूथ मतदान केंद्र परिसरात लागायला सुरूवात झाली होती. मतदारयाद्या व लॅपटॉप घेऊन कार्यकर्ते आपापल्या बूथवर हजर होते व येणा-या मतदारांना यादीमधील त्यांची माहिती शोधून देत होते. उमेदवार जितका मोठा, तितकी चांगली व्यवस्था त्या त्या बूथवर बघायला मिळत होती.
खामला परिसरात सोमलवार शाळेजवळ काही कार्यकर्त्यांच्या नशिबात शामियाना होता तर अनेकांना झाडाखालीच आपले बस्तान मांडावे लागले. सिव्हील लाईन्स, मेडिकल चौक, हनुमान नगर इत्यादी भागात पुरुष कार्यकर्त्यांप्रमाणेच बूथवरील महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती व त्यातही महाविद्यालयीन तरूणींचा भरणा अधिक होता.  सकाळच्या सत्रात मोठया संख्येने मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले आणि वेगवेगळया बूथवर गर्दी दिसायला लागली. मात्र, अपेक्षेप्रमाणे आज मतदानाच्या दिवशी पाऊस बरसला आणि ठिकठिकाणी बूथवर बसणा-या कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. शहरात सर्वत्र पावसाचा परिणाम एकीकडे
मतदारसंख्या रोडावण्यावर झाला तर दुसरीकडे कार्यकर्त्यांना आपले बूथ सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी बरीच धावपळ करावी लागली. पावसाचा जोर वाढला आणि कित्येक ठिकाणी बूथ तात्पुरते गुंडाळून ठेवण्याशिवाय कार्यकर्त्यांसमोर पर्याय उरला नाही.
पाऊस थांबल्यावर पुन्हा एकदा मतदारांची पावले मतदानकेंद्राकडे वळू लागली आणि ओस पडलेल्या बूथवर वर्दळ दिसायला लागली. छापील याद्यांची पाने धुंडाळत बसण्यापेक्षा, कार्यकर्त्यांंनी लॅपटॉपवरील सॉफटवेअर, इंटरनेट आणि मोबाईल अ‍ॅप्सचा आधार घेत मतदारांना त्यांची नावे शोधून देणे अधिक पसंत केले. अनेक मतदारांनी येताना मतदारयादीतील आपली माहितीही स्वत:बरोबर आणली होती. दक्षिण-पश्चिम व पश्चिम नागपुरात दोन मतदारसंघांच्या सीमारेषेवर असणा-या मतदारांचा मतदार केंद्रांबाबत गोंधळ उडाल्याने त्यांनी मतदान बूथवर एकच गर्दी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A significant number of women workers present on voting booth as compared to male workers
First published on: 16-10-2014 at 01:27 IST