देशभरात प्रख्यात झालेली पोद्दारेश्वर राममंदिरातील श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा उद्या, शुक्रवारी पोद्दारेश्वर मंदिर व रामनगरातील राम मंदिर व उत्तर नागपुरातून मोतीबागजवळून निघणार आहे. या शोभायात्रेच्या निमित्ताने तीनही शोभायात्रेच्या मार्गावर विविध भागात प्रवेशद्वार उभारण्यात आले असून चौकाचौकात विविध आकर्षक पौराणिक दृश्ये साकारण्यात आली आहेत.
विदर्भात अमरावती, अकोला, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्य़ातील राम मंदिरात रामजन्मोत्सवनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. नागपूरपासून ६० किमी दूर असलेल्या रामटेकमध्ये रामजन्मोत्सव साजरा होणार असून या ठिकाणी भाविकांची होणारी गर्दी बघता प्रशासनाने तयार केली आहे.
उद्या, शुक्रवारी दुपारी ४ वाजता महापौर अनिल सोले यांच्यासह खासदार विलास मुत्तेमवार, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधीच्या हस्ते पूजा होऊन पोद्यारेश्वर मंदिरमधून शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. यावर्षी शोभायात्रेत पौराणिक व सामाजिक विषयांवर आधारित ६० पेक्षा अधिक चित्ररथ, १६ बहारदार लोकनृत्यांसह लहानलहान चित्ररथही सहभागी होणार आहे. पोद्दारेश्वार राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेचे यंदा ४७ वे वर्ष असून त्यात विविध जाती धर्माचे लोक सहभागी होत असतात. यावेळी पालकमंत्री शिवाजीराव मोघे, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, रोहयो मंत्री नितीन राऊत, आमदार देवेंद्र फडणवीस, दीनानाथ पडोळे, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, पोलीस आयुक्त के.के.पाठक, अनिस अहमद आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे रामनगमधून शोभायात्रा निघणार असून त्यातही विविध चित्ररथ सहभागी होणार आहे. सायंकाळी ६ वाजता महापौर अनिल सोले,  भारतीय जनता पक्षाचे अखिल भारतीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रभूरामचंद्राची पूजा करण्यात येणार आहे. या ठिकाणी खासदार विलास मुत्तेमवार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ ,खासदार दत्ता मेघे, सुधाकर देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
उत्तर नागपुरात मोतीबाग परिसरातून बेलिशॉप प्राचीन शिवमंदिरातून शोभायात्रा निघणार आहे. शोभायात्रेत गोल्डन रामरथासह विविध पौराणिक विषयावर चित्ररथ राहणार आहे. दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव झाल्यानंतर दुपारी ४ वाजता शोभायात्रेला प्रारंभ होईल. यावेळी रोहयो मंत्री नितिन  राऊत, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे व्यवस्थापक एस.एल. वर्मा, सुरक्षा आयुक्त प्रदीपकुमार, डॉ. विलास डांगरे, नगरसेवक संदीप सहारे, दीपक लालवानी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. शोभायात्रेचे ११ वे वर्ष आहे. शोभायात्रेत ५० पेक्षा अधिक चित्ररथ आणि नृत्य सहभागी होणार असून मार्गावर प्रवेशद्वारासह आकर्षक सजावट करण्यात आली
आहे.   महालातील भोसला पॅलेसमधून दुपारी ४ वाजता रामजन्मोत्सवनिमित्त शोभायात्रा निघणार आहे. श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात येईल. १७२५ मध्ये श्रीमंत राजे रघुजी राजे भोसले यांनी शोभायात्रेला प्रारंभ केला होता. या शोभायात्रेला तीनशे वर्षांचा इतिहास आहे