सहकार खात्याकडून संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात, ठेवीदारांची ‘संपदा पंचायत’ बुधवारी (दि. २१) सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आली आहे. त्यास बरखास्त संचालक मंडळ, संस्थेचे अधिकारी व कर्मचारी, लेखापरिक्षक, सहकार खात्याचे अधिकारी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या
प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे.
संपदा ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष अॅड. निळकंठ सोले यांनी ही माहिती दिली. या संदर्भात माहिती देताना सोले यांनी सांगितले की, गैरव्यवहारांमुळे संपदा पतसंस्था बरखास्त होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला. परंतु जबाबदार कोणावरही कारवाई झाली नाही. संस्थेचे लेखापरिक्षणही करण्यात आले नाही. बरखास्तीनंतर संस्थेवर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले, मात्र मंडळातीलच काहीं जणांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी झाल्या. त्यासाठी सहकार खात्याने चौकशी समिती नेमली, परंतु त्या समितीचा अहवाल नाही, कारवाई नाही. संस्थेच्या गुलमोहर रस्त्यावरील गाळ्याची बेकायदा विक्री झाली, समितीने विरोध केल्यानंतर विक्री बेकायदा ठरवली गेली, परंतु गाळ्यास बेकायदा ग्रील लावणाऱ्या विरुद्ध सहकार खात्याने पोलीसांकडे फिर्याद दिलेली नाही. सहकार खात्याने १० नोव्हेंबर पर्यंत लेखापरिक्षण पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, त्यासाठी खात्याने कोणतीही कारवाई केली नाही. संस्थेवर सहकार खात्यातील अधिकारी प्रशासक आहेत, परंतु त्यांचेही कामकाज ठप्प आहे, वसुलीही बंद आहे.
यासर्व परिस्थितीबाबत निर्णय घेऊन कर्ज वसुलीस दिशा देण्यासाठी, संस्थेच्या नुकसानीची भरपाई करुन घेण्यासाठी, संपदाच्या पैशातून उभ्या राहिलेल्या ट्रस्टच्या मालमत्तेवर टाच आणून त्याच्या जप्तीतून ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी काय करता
येईल, याविषयी पंचायतमध्ये चर्चा केली जाणार असल्याचे सोले यांनी सांगितले. कार्यक्रमास संपदाच्या ठेवीदारांनी उपस्थित रहावे,
असे आवाहन त्यांनी
केले.