कोल्हापूर शहरात बोकाळलेल्या बेकायदा मोबाइल टॉवरविरोधात महापालिकेने कारवाईची मोहीम उघडली आहे. २३८ मोबाइल टॉवरपैकी तब्बल १४७ टॉवर विनापरवाना, अनधिकृत असल्याचे उघडकीस आले आहे. अनधिकृतपणे बांधलेल्या इमारतीवरील टॉवर चोवीस तासांत बंद करण्याचे आदेशही महापालिकेकडून लागू केले जाणार आहेत.    
महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी खासगी इमारतीवर तसेच मोकळय़ा जागेवर मोबाइल कंपन्यांतर्फे मोबाइल टॉवर उभारण्याकरिता महापालिकेकडे प्रस्ताव दाखल होत असतात. महापालिकेची परवानगी घेऊनच टॉवरचे बांधकाम करणे अपेक्षित असते. तथापि शहरामध्ये अनेक मोबाइल टॉवर परवानगीशिवाय अनधिकृतरीत्या उभारल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनधिकृत टॉवर्सना नियमित करण्याकरिता शासन निर्णय व न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. त्यासाठी टॉवरचालकांना नोटीस पाठविण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू केली जात आहे. त्यासाठी आठ अटींचे पालन करण्याबाबतची सूचना टॉवरचालकांना दिल्या आहेत.     
महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार शहरात २३८ मोबाइलचे टॉवर आहेत. त्यापैकी केवळ ९१ टॉवरना परवाना देण्यात आला आहे. तब्बल १४७ टॉवर विनापरवाना सुरू करण्यात आले आहेत. विनापरवाना टॉवरपैकी १८ टॉवरना सील ठोकण्यात आले आहे. १२६ अनधिकृत टॉवरवर कारवाई करण्याचे प्रकरण प्रलंबित आहे. अनधिकृत असलेल्या पण त्यासाठी परवानगी घेण्याकरिता ७८ टॉवरचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. टॉवरचालकांनी विहित मुदतीत परवान्याचे काम पूर्ण करून घ्यावे अन्यथा त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.