पुण्यातील अनेक शाळांमध्ये बालवाडी किंवा केजीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अशा शाळांवर धाडी टाकून त्यांची प्रवेश प्रक्रिया बंद करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. श्रीधर साळुंखे यांनी शुक्रवारी सांगितले.
पुण्यातील अनेक नामवंत शाळांसमोर सध्या प्रवेशासाठी रांगा लागलेल्या दिसत आहेत. अनेक शाळांनी त्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शाळांनी १५ ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये प्रवेश प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे पालकांच्या मुलाखती घेणे, शाळेच्या माहिती पुस्तकाची विक्री करण्यासही बंदी आहे. मात्र, अनेक शाळांनी या नियमाचे उल्लंघन करून प्रवेश प्रक्रिया सुरू केल्या आहेत. याबाबत डॉ. साळुंखे यांनी सांगितले, ‘‘नोव्हेंबर -डिसेंबरमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू न करण्याबाबत शाळांना वेळोवेळी लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही शाळांना देण्यात आले आहे. मात्र, तरीही ज्या शाळांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केल्या आहेत अशा शाळांवर धाडी टाकून, प्रवेश प्रक्रिया बंद करून या शाळांवर कारवाई करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ज्या शाळांच्या माहिती पुस्तकांची विक्री करण्यात येत असेल किंवा पालकांच्या मुलाखती घेतल्या जात असतील अशा शाळांवरही कारवाई करण्यात येणार आहे. शिक्षण हक्क कायद्याचा भंग होणार नाही, याची प्रत्येक शाळेने काळजी घेणे आवश्यक आहे.’’