तत्कालीन जळगाव नगर पालिका आणि महापालिकेतील कोटय़वधींच्या गैरव्यवहार प्रश्नी, तसेच खान्देश मिलच्या जागेसंबंधी आपण सातत्याने आवाज उठविला असल्याने आपण स्वत: गैरकृत्य करण्याचे पाप करणार नाही. त्यामुळे भूखंड विक्री प्रकरणात आपले नाव गोवणाऱ्यांविरूध्द आपण फौजदारी गुन्हे दाखल करणार आहोत, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते उल्हास साबळे यांनी दिला आहे. व्यक्तीद्वेषातून काही राजकीय हस्तकांनीच हा प्रकार असल्याचे त्यांनी त्यात स्पष्टपणे म्हटले आहे. पिंप्राळा शिवारातील भूखंडाच्या व्यवहाराच्या कारणावरून सदर दावा दाखल केल्याचे साबळे यांनी म्हटले आहे. सुनिता इपर यांनी दाखल केलेल्या दाव्यात आपला कोणताही संबंध नाही. तरीही बदनामी करण्याच्या हेतूने इपर दाम्पत्याने पत्रकबाजी केल्याचा आरोप साबळे यांनी केला आहे. जळगाव पालिकेतील कोटय़वधींचे घोटाळे, बेकायदा ठराव, बेकायदा पदोन्नत्या, अधिकाऱ्यांचे गैरव्यवहार व खान्देश मिल संदर्भात आपण सातत्याने जिल्हा प्रशासन व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच काही राजकीय हस्तकांनी आपल्या बदानामीचा हा प्रकार सुरू केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.