‘सरदार मै फिरसे क हता हू..यह पुलिस का आदमी है’ हा संवाद असू दे नाहीतर ‘शेरखान की शादी नही हुई तो क्या हुआ, बाराते तो कई देखी है’ हा ‘जंजीर’मधील संवाद असेल. हे संवाद म्हणजे सहज जाता जाता बोलली जाणारी वाक्यं आहेत. पण, तरीही ती साधीसुधी वाटणारी वाक्यं अशा थाटात बोलली गेली आहेत की बस्स्! बेरकी आवाज, भेदक नजर आणि आपल्या व्यक्तिरेखा ठसवण्यासाठी वापरलेल्या विविध क्लृप्त्या यांच्यामुळे प्राण यांनी साकारलेल्या अगदी सामान्य व्यक्तिरेखाही लक्षात राहतात. अगदी पाकिटमारापासून ते दारूच्या आहारी गेलेल्या मुलाच्या हेकेखोर वडिलांपर्यंत अनेक भूमिका प्राण यांनी आपल्या अनोख्या शैलीने जिवंत केल्या. त्यांच्या काही अविस्मरणीय भूमिकांचा हा धावता आढावा..

१९४२ पासून ते २००१ पर्यंत प्राण यांनी तब्बल ३५० चित्रपटांमधून विविधरंगी-ढंगी भूमिका केल्या आहेत. मात्र, त्यांचे नाव निघाले की नव्या आणि जुन्या पिढीलाही चटकन आठवणारी भूमिका म्हणजे ‘जंजीर’ चित्रपटातील ‘शेरखान’. संपूर्णपणे पठाणी अवतारातील प्राण यांचा शेरखान आणि त्याची इन्स्पेक्टर विजयशी (अमिताभ बच्चन) असलेली मैत्री विसरणे शक्य नाही. ‘जंजीर’मध्ये अमिताभ बच्चनचा प्रवेश झाला तोच मुळी प्राण यांच्यामुळे. अमिताभला ही भूमिका द्यावी, असा सल्ला प्राण यांनीच दिग्दर्शक प्रकाश मेहरांना दिला होता. अमिताभ आणि प्राण यांची जोडी अनेक चित्रपटांमधून रंगली. ‘कालिया’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा पाठलाग करणारा जेलर रघुवीर सिंग, अमिताभबरोबर ‘नसीब’ चित्रपटात साकारलेला ‘नामदेव’ आणि या सर्वावर कडी करणारा ‘शराबी’ चित्रपटातील बाप. आपल्या मुलाला प्रेम आणि मायेने वाढवण्यापेक्षा पैशानी मोठा करणारा बाप. वडिलांचे प्रेम मिळत नाही म्हणून मुलगा दारूच्या आहारी गेला तरी कठोर काळजाचा आणि सत्ता हेच सर्वस्व मानणारा बाप आणि त्याच्या मुलातला संघर्ष प्राण-अमिताभ या दोन मातब्बर अभिनेत्यांच्या जोडीने असा काही रंगवला की पाहणाऱ्याचे मन हेलावून जावे.
रूढार्थाने प्राण यांनी साकारलेल्या सगळ्याच भूमिका काही खलनायकी नव्हत्या. पण, त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेला आपले असे एक रंग-रूप दिले. ‘उपकार’ चित्रपटातील दोन्हा काखेत कुबडय़ा घेऊन चालणारा मंगलचाचा, १९६० साली आलेल्या ‘जिस देश मे गंगा बहती है’ चित्रपटात ‘तेरा बाप राक्का’ म्हणत बंदूक उगारणारा राको, ‘काश्मीर की कली’मध्ये ‘सता ले सता ले मेरा भी वक्त आएगा..’ म्हणत स्वत:च सतावणारा कश्मिरी खलनायक, किशोर कुमारबरोबरचा ‘हाफ तिकट’मधील स्मगलर राजाबाबू, ‘अमर अकबर अ‍ॅंथनी’ चित्रपटातील किशन लाल आणि या सगळ्यांच्या विरूध्द १९७२ साली आलेल्या परिचय चित्रपटातील एकाचवेळी वरून कडक भासणारे पण, मनाने हळवे असे ‘दादाजी’. अशा कितीतरी भूमिकांमध्ये स्वत:च्या शैलीने आणि प्रयत्नांनी ‘प्राण’ ओतणारा हा अभिनेता आपल्याला आठवत राहतो. खलनायकाची व्यक्तिरेखा असली काय आणि चरित्रनायकाची व्यक्तिरेखा असली काय त्यांच्या नजरेतली आणि आवाजातली जरब कधीच बदलली नाही. त्यामुळेच असेल पण, आपल्या भूमिकांनी जो दबदबा प्राण यांनी निर्माण केला होता त्यांची जागा आजवर कोणीही भरून काढू शकलेले नाही. म्हणूनच हिंदी चित्रपटसृष्टीला प्राण यांच्यासारख्या जुन्या आणि मातब्बर कलाकाराची उणीव नेहमीच भासत राहिल.