नशेला आधीन झालेली तरुणाई खोकल्याचे सीरप आणि झोपेच्या गोळ्यांमधूनही नशेचा अवलंब करू लागल्याचे प्रकार तसे नवे राहिलेले नाहीत. मात्र, ठाणे पोलिसांच्या अंमलीविरोधी पथकाने नुकत्याच केलेल्या एका कारवाईत धक्कादायक माहिती पुढे येऊ लागली असून ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांमधील पानाच्या गाद्यांवरही नशेला निमंत्रण देणाऱ्या या गोळ्या आणि सिरपची विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून ठाणे-मुंब््रयाच्या टपऱ्यांपर्यंत या गोळ्या पोहचविणारी एक मोठी साखळी गेल्या काही काळापासून कार्यरत झाली आहे. विशेष म्हणजे, नशेचा हा मार्ग अधिक विस्तारत नेण्यासाठी खास एजन्ट नेमण्यात आल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे. ठाण्याच्या अन्न व औषध विभागानेही पोलिसांना ही साखळी उघड करण्यात मदत केली असून या गोळ्यांमध्ये ही नशेची मात्रा नेमकी किती प्रमाणात असते याचा नव्याने अभ्यासही सुरू करण्यात आला आहे.
  ठाणे येथील कळवा परिसरात नामांकित कंपन्यांच्या झोपेच्या गोळ्या आणि खोकल्याचे सिरप विक्रीसाठी आलेल्या सुलेमान ऊमर साठे (५२) या व्यक्तीला ठाणे अंमली विरोधी पथकाने नुकतीच अटक केली. सुलेमानकडून सुमारे ६४ हजारांचा औषध साठा जप्त करण्यात आला. झोपेच्या गोळ्या आणि खोकल्याच्या सिरपचा मोठा साठा यावेळी त्याच्याकडे आढळून आला. पोलीस अधिक खोलात गेले असता हा सगळा साठा नशेसाठी वापरात आणला जात असल्याची धक्कादायक माहिती मिळाली असून तिची विक्री पान, सिगारेट विक्रीच्या टपऱ्यांवर होत असल्याचे स्पष्ट होऊ लागल्याने या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. जेथून ही औषधे आणली जातात त्या कंपन्या गुजरात तसेच इंदौर भागात आहेत. तेथून मुंबई-अहमदाबाद मार्गे या औषधांचा साठा विनापरवाना छुप्या पद्धतीने वाहतूक करून महाराष्ट्रात आणला जातो आणि नशेसाठी राज्यातील वेगवेगळ्या भागात एजंटमार्फत दुकान विक्रेत्यांपर्यंत पोहचविण्यात येतो, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे. अटक केलेला सुलेमान भिवंडी येथील अंबाडीगाव परिसरात राहतो. ठाणे अंमली विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे सुलेमानला कळवा परिसरातून अटक केली असून त्याच्याकडे झोपेच्या गोळ्यांची पाकिटे आणि खोकल्याचे सिरप, असा सुमारे ६४ हजारांचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.
डॉक्टरांची परवानगी आवश्यक
पोलिसांनी हस्तगत केलेल्या औषधांमध्ये ट्रनॅक्स -१ आणि रॅक्सोफ यासारख्या औषधांचा समावेश आहे. या औषधांचा वापर नशेसाठी मोठय़ा प्रमाणात करण्यात येत असल्यामुळे मेडिकल चालकही डॉक्टरांच्या परवानगीशिवाय या औषधांची विक्री करीत नाहीत. त्यामुळे या औषधांची आता विनापरवाना छुप्या पद्धतीने वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे. गुजरात तसेच इंदौर भागात या औषधांच्या नामांकित कंपन्या असून तेथून मुंबई-अहमदाबाद  महामार्गाद्वारे ही औषधे राज्यात येतात. त्यासाठी ठिकठिकाणी एजंट कार्यरत असल्याची माहितीही पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. या औषधांच्या वितरणामध्ये काही वितरकांचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून त्या दिशेने पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे.
कमी पैशात नशा
झोपेच्या गोळ्या आणि खोकल्याचे सिरप अवघ्या ४० ते ५० रुपयांमध्ये या टपऱ्यांवर उपलब्ध होत असल्यामुळे कमी पैशात नशेची सोय होत आहे. अशा टपऱ्यांची इत्थंभूत माहिती गर्दुल्यांकडे असते. त्यामुळे आणखी कोणत्या टपऱ्यांवर अशाप्रकारे औषधांची विक्री होत आहे, याचा शोधही पोलिसांनी सुरू केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Addiction of tablets sale on small shops in thane
First published on: 29-08-2014 at 01:05 IST