यंदाचा दुष्काळ सर्वात मोठा आहे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मागील व चालू हंगामातही मोठय़ा प्रमाणात भेडसावू लागला आहे. मजुरांच्या हाताला काम नाही, पुढील पाण्याचे आवर्तन ७ महिन्यांनंतरच मिळणार आहे. यातील कुठल्याच गोष्टीचे गांभीर्य प्रशासनाला नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव बिपीन कोल्हे यांनी केली.
तालुक्याच्या पश्चिम भागातील शहापूर, बहादराबाद, जवळके, बहादरपूर, अंजनापूर व रांजणगाव देशमुख येथील दुष्काळी परिस्थितीचा, पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा आढावा दौरा बुधवारी झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. सभापती मच्छिंद्र केकाण, प्रभारी गटविकास अधिकारी श्री. तागड, तालुका राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष त्र्यंबकराव सरोदे, संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष विलासराव वाबळे, संचालक बापूसाहेब औताडे, श्रीपतराव गवळी आदी योवळी होते. जवळके, बहादराबाद आणि शहापूर या तीन गावच्या नळपाणीपुरवठा योजनेचे वीज बिल व पाणीपट्टी बिल मोठय़ा प्रमाणात थकलेले आहे. ते भरण्यासाठी शासनाने पैसे उपलब्ध करून द्यावे, शहापूर लोकवस्ती वाढत असल्याने पिण्याची पाईपलाईन वाढविण्यात यावी. पांढरेवस्ती येथील विंधन विहिरीवर हातपंप बसवावा, पाझर तलावातील गाळ काढावा, पशुगणना चुकीची झालेली आहे, त्याची फेरतपासणी करण्यात यावी, रात्रीचे ७ ते १० या वेळेतील विजेचे भारनियमन रद्द करण्यात यावे आदी मागण्या येवेळी करण्यात आल्या.