देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना अर्थसाहाय्य उपलब्ध करण्याचे काम सहकारी बँका करीत आहेत, त्यात पंढरपूर अर्बन बँकेने केलेली कामगिरी प्रशंसनीय आहे, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज येथे सांगितले.  सुमारे एक कोटी रूपये खर्चून पंढरपूर अर्बन बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले असून बँकेच्या कोअर प्रणालीचे उदघाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कळ दाबून केले. या वेळी बँकेच्या कामकाजावर आधारित माहितीपटाचे अनावरण राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी केले. या वेळी आमदार गणपतराव देशमुख, आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार सुधाकर परिचारक, माजी आमदार राजन पाटील, आमदार बबन शिंदे, पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे उपस्थित होते.  प्रास्ताविक व स्वागत बँकेचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी केले.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले की, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत चोखामेळा अशा संतांनी पंढरपुरात आध्यात्मिक चिंतन केले. त्यांच्या शिकवणुकीमुळे आजच्या समजात मतभेद विसरून एकतेने राहण्याची वृत्ती कायम आहे.
दिल्ली येथील पीडित मुलीच्या निधनाबद्दल मुखर्जी यांनी शोक व्यक्त केला व अशा घटनांचा सामना सामाजिक पातळीवर करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
राष्ट्रपतींचा बँकेचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी पगडी, विठ्ठल प्रतिमा देऊन सत्कार केला. भारत गदगे यांनी काढेले ‘विठु माझा लेकुरवाळा’ हे चित्र त्यांना प्रदान करण्यात आले. राज्यपाल शंकरनारायणन व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा उपाध्यक्ष उदय उत्पात यांनी सत्कार केला. रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाचे नियम पाळून पंढरपूर अर्बन बँकेने केलेले काम कौतुकास्पद आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
राज्यात ७२ पेक्षाही गंभीर दुष्काळ असून ऑगस्टपर्यंत पाणी पुरवणे सोपे नाही. दुष्काळी भागाचा आपण दौरा करणार आहोत, पण लोकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे त्यांनी स्पष्ट केले.