शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा उमेदवारी देणार आहे, अशी घोषणा सेनेचे संपर्कप्रमुख सुहास सामंत यांनी केली. राहुरी येथील सरकारी विश्रामगृहावर शिवसेनेच्या उत्तर जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. बैठकीनंतर सामंत वार्ताहरांशी बोलत होते. या वेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उपजिल्हाप्रमुख भागवत मुंगसे, शेखर बो-हाडे, डॉ.महेश क्षीरसागर, कैलास जाधव, दिलीप तागड आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत खासदार वाकचौरे यांनाच पुन्हा उमेदवारी द्यावी, असा ठराव सर्व पदाधिका-यांनी केला. शिवसेनेच्या ध्येयधोरणानुसार खासदार भाऊसाहेब वाकचौरे काम करतात. चार वर्षांत त्यांनी चांगले काम केले आहे. लोकांशी संपर्क ठेवला आहे. दुष्काळ निवारणाच्या कार्यात पुढाकार घेतला. वाकचौरे यांच्या इतका सक्षम उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादीकडे नाही, त्यामुळे सेनेकडून पुन्हा एकदा वाकचौरे खासदार होणार आहे असे ते म्हणाले.
या वेळी तालुकाप्रमुख सर्जेराव घाडगे, देवीदास सोनवणे, कमलाकर कोते, शिवाजी ठाकरे, बाबासाहेब कुटे, मच्छिंद्र धुमाळ, डॉ. संजय म्हसे, बाबासाहेब मुसमाडे, सचिन कोते, काका शेखो, बबलू धूमाळ आदी उपस्थित होते.