येथील शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्यावतीने तत्कालीन शिक्षण उपसंचालक तुकाराम सुपे यांच्या भ्रष्ट काराभाराविरूध्द तसेच शिक्षण विभागातील अनागोंदी कारभाराविरोधात ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
शिक्षण खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीकडे आंदोलनाद्वारे लक्ष वेधले जाणार आहे. नाशिक विभागाच्या शिक्षण उपसंचालक पदावर चार वर्षे सुपे यांनी काम पाहिले. त्यानंतर त्यांची पुणे महापालिका शिक्षण मंडळावर नियुक्ती करण्यात आली. या मधल्या काळात सुपे यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली. न्यू इरा, रासबिहारी, सिल्व्हर ओक, अशोका युनिव्हर्सल स्कूल या शाळातील पालकांनी शालेय व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरोधात अनेक वेळा आंदोलने केली. या आंदोलनाची दखल न घेता व्यवस्थापनालाच सुपे यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई न करता पाठीशी घातले.
सुपे यांच्यासारखे भ्रष्टाचार व अकार्यक्षमतेचे आरोप असलेले अनेक अधिकारी शिक्षण खात्यात कार्यरत आहेत. यामुळे शिक्षण क्षेत्रातील अनियमीतता व बेकायदा व्यवहार वाढले असल्याचा आरोप मंचने केला आहे. शालेय व्यवस्थापन याचा गैरफायदा घेत पालकांचे व विद्यार्थ्यांचे शोषण विविध माध्यमातून करत आहे. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी शनिवारी निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती मंचचे डॉ. मिलिंद वाघ यांनी दिली. निदर्शनात पालकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीधर देशपांडे, छाया देव यांनी केले आहे.