करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर या तालुक्यातील आमदार श्यामल बागल व माजी आमदार जयवंत जगताप यांच्यातील संघर्ष उफाळला आहे. त्याची परिणती एका प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली म्हणून आमदार श्यामल बागल यांचे पुत्र तथा मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बागल विरोधकांनी एकत्र येऊन करमाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मात्र आमदार बागल यांनी आपल्या पुत्राविरुध्द करण्यात आलेले आरोप स्पष्ट शब्दात फेटाळले असून हे केवळ राजकीय षड्यंत्र असल्याची प्रतिक्रिया नोंदविली.
बागल-जगताप गटातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या वादातून करमाळा पोलीस ठाण्यात एकमेकांविरुध्द तक्रारी केल्या गेल्या. यावेळी बागल गटाच्या बाजूने दिग्विजय बागल हे पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी तेथील पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे यांना उद्देशून दमदाटी व शिवीगाळ केल्याचा आरोप जगताप गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणी बागल यांच्या विरुध्द गुन्हा दाखल व्हावा अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी जगताप गटासह बागल विरोधातील अन्य राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. करमाळ्याच्या नगराध्यक्षा पुष्पा फंड व उपनगराध्यक्ष नारायण जगताप यांच्यासह नगरसेवक दादाराव लोंढे, अहमद कुरेशी, फारूख जमादार, भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष शहाजी ठोसर, बाबा घोडके, सुहास घोलप, भाजपचे तालुकाध्यक्ष शशिकांत पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश चिवटे, सचिव विवेक येवले, उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील, शिवसेना माजी शहरप्रमुख संजय शीलवंत आदींचा या आंदोलनात सहभाग होता. पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब बंडगर व पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणी दिग्विजय बागल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र त्यांच्या मातु:श्री तथा राष्ट्रवादीच्या आमदार श्यामल बागल यांनी मात्र आपल्या चिरंजीवाविरुध्दचे आरोप स्पष्ट शब्दात फेटाळून लावले. दिग्विजय बागल यांनी पोलीस ठाण्यात आपल्या कार्यकर्त्यांची बाजू भक्कमपणे मांडल्याने त्याचा राग मनात धरून विरोधकांनी केवळ राजकीय षड्यंत्र म्हणून आंदोलनाच्या रूपाने स्टंटबाजी केल्याचा प्रत्यारोप आमदार बागल यांनी केला.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jan 2013 रोजी प्रकाशित
करमाळ्यात बागलविरुध्द गुन्हा दाखल होण्यासाठी धरणे आंदोलन
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर या तालुक्यातील आमदार श्यामल बागल व माजी आमदार जयवंत जगताप यांच्यातील संघर्ष उफाळला आहे. त्याची परिणती एका प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली म्हणून आमदार श्यामल बागल यांचे पुत्र तथा मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बागल विरोधकांनी एकत्र येऊन करमाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
First published on: 28-01-2013 at 09:10 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation for submit crime against bagal in karmala