स्थलांतरीत कामगारांसाठी आरोग्य शिबीर, शिवांबु चिकित्सेबद्दल मार्गदर्शन, जनजागृती फेरी व पुस्तिकांचे वितरण, मार्गदर्शनपर व्याख्याने, अशा विविध उपक्रमांनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात जागतिक एड्स विरोधी दिन साजरा करण्यात आला.
जागतिक एड्स दिनानिमित्त इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या नाशिक शाखेतर्फे भव्य जनजागृती फेरी काढण्यात आली. त्यात सारडा कन्या विद्यालय, राजेबहादूर मेडिको नर्सिग इन्स्टिटय़ुट, रचना ट्रस्ट, गणपतराव आडके नर्सिग इन्स्टिटय़ुट, स्वामी नारायण नर्सिग इन्स्टिटय़ुट या संस्थांचे पदाधिकारी व विद्यार्थी सहभागी झाले होते. गेल्या काही वर्षांत जनजागृती व वैद्यकीय क्षेत्रातील निरंतर संशोधनामुळे एड्सच्या मृत्यूदरात लक्षणिय घट झाली आहे. याच पद्धतीने प्रयत्न सुरू राहिल्यास २०१५ पर्यंत एच. आय. व्ही. बाधा होण्याचे प्रमाण शुन्यावर आणणे शक्य होईल. त्यासाठी युवकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे प्रतिपादन रेड क्रॉसचे सचिव मेजर पी. एम भगत यांनी केले. सोसायटीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा औंधकर यांनी उपस्थितांना एच. आय. व्ही., एड्स रुग्णांबाबत नागरिकांच्या कर्तव्याची शपथ प्रदान केली. सूत्रसंचालन एच. आय. व्ही. एड्स पिअर एज्युकेशन कार्यक्रमाच्या जिल्हा प्रकल्प समन्वयक कविता पवार यांनी केले.
नंदुरबारमध्ये एड्सविषयक जनजागृती फेरी
जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित फेरीचे उद्घाटन सहाय्यक जिल्हाधिकारी सुमन रावत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
प्रारंभी, सर्व विद्यार्थ्यांना जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हेमंत बोरसे, कार्यक्रम अधिकारी बी. आर. शिंदे यांनी शपथ दिली.
फेरीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था व डी. आर. हायस्कूल आदींचे विद्यार्थी सहभागी झाले होते. एड्सविषयक जनजागृती फेरीमध्ये  सहाय्यक आरोग्य अधिकारी एस. व्ही. नांद्रे, विश्वास सूर्यवंशी, आशा माळी आदी नागरिक आवर्जून उपस्थित होते.
शिवांबु चिकित्सा मंडळाचा कार्यक्रम
शिवांबु चिकित्सा व संशोधन मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात एड्सवर नियंत्रण मिळविण्यासाठी निसर्गोपचार व शिवांबु चिकित्सा महत्वपूर्ण असल्याची माहिती स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर यांनी दिली.
हुतात्मा स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमास डॉ. प्रतापराव देशमुख उपस्थित होते. शिवांबु चिकित्सेत जे नवीन प्रयोग झाले, त्यात अनेक असाध्य रोगांवर या चिकित्सेचा चांगला परिणाम होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या चिकित्सेचा प्रसार झाल्यास एड्ससारख्या आजारावरही मात करता येईल, अशी आशा मंडळाचे अध्यक्ष डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली.
यावेळी दादा चाकणे, अण्ण गिलानकर, डॉ. रमाकांत जाधव, बाळासाहेब अहिरे, काका चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वावरे महाविद्यालय आणि यश फाऊंडेशनचा   एड्स जनजागृती विषयक कार्यक्रम
शहरातील वावरे महाविद्यालय, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा व यश फाऊंडेशन यांच्यातर्फे एड्स जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले.
जनजागरण रॅलीच्या सुरुवातीला माजी पंतप्रधान डॉ. इंद्रकुमार गुजराल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक एन. इक्बाल, यश फाऊंडेशनच्या चंद्रमा पाटील, जितेंद्र पाटील व प्राचार्य डॉ. किशोर पवार यांनी मार्गदर्शन केले. निलम कोरी या स्वयंसेविकेने एड्सवर आधारीत पथनाटय़ सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो प्रमुख प्रा. एस. टी. घुले यांनी केले तर आभार चंद्रमा पाटील यांनी मानले.

More Stories onनाशिकNashik
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aids day celebrated by lots of event
First published on: 04-12-2012 at 02:00 IST