पाझर तलाव, गाव-तलाव आदीमधील गाळ शेतकरी स्वखर्चाने घेऊन जाण्यास तयार असतानाही जे अधिकारी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी लागेल असा इशारा देत मेढा येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कामचुकार अधिकाऱ्यांची हजेरी घेतली.
महू-हातगेघर धरण व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच अनेक कामे करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र गावोगावचे पाझर तलाव, गाव-तलाव आदीमधील गाळ शेतकरी स्वखर्चाने घेऊन जाण्यास तयार असतानाही अधिकारी वर्ग गाळ घेऊन जाण्यास परवानगी देत नाही, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केल्यानंतर अजित पवार त्या अधिकाऱ्यांवर घसरले. कोण अधिकारी, काय नाव त्याचे, कुठलाय तो. प्रांत कोण आहे. तहसीलदार कोण? कुठं गेला तो अधिकारी असा नावासह एकेरी भाषेत उल्लेख करत ओ. चव्हाणसाहेब.. अहो धरणातील पाझर तलावातील गाळ काढण्यासाठी आणि शेतामध्ये नेण्यासाठी रोखू नका. फुकट द्या फुकट गाळ, असा निर्णय कॅबिनेटमध्येच झाला आहे. त्यामुळे तलाव धरणातील पाणीसाठी वाटण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक होण्यास मदत होणार आहे.
शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांविषयी तक्रार केल्यावर रुद्रावतार धारण करणारे अजित पवार पाहिल्यावर शेतकरी सुखावले पण अधिकारी मात्र चांगलेच दुखावले. असे एकेरीत अधिकाऱ्यांना धारेवर धरायचे म्हणजे काय आणि सर्वासमक्ष अशी प्रतिक्रिया अधिकारी वर्गाची होती. मात्र अजित पवारांच्या या दणक्याची चांगलीच भीती अधिकाऱ्यांनी घेतली हे नक्की.
भाजप म्हणजे नाकाने कांदा सोलणारा पक्ष आहे. असे सांगताना ते शहरात एक आणि ग्रामीण भागात वेगळेच बोलतात. कुठंच खरं बोलत नाहीत असा टोलाही भाजपला लगावला. तर एका जिल्हा परिषद सदस्यांची फिरकी घेताना ते म्हणाले अमित तब्येत वाढतेय दिवसेंदिवस काळजी घे. मला माझ्या चुलत्यांनी उपमुख्यमंत्री केले तरी माझी तब्ब्येत वाढली नाही. तुझ्या वयात माझी तब्येत एवढी सडपातळ होती की, मला आता मीच ओळखत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. आरोग्याकडे लक्ष द्यावे. चिटफंड,सोने दुप्पट करून देतो. पैसे दुप्पट करून देतो अशा आमिषाला कोणी फसू नये असा सल्ला त्यांनी दिला.