विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी काशिनाथ दाते यांना मिळाल्यास काँग्रेसचे कार्यकर्ते आघाडीचा धर्म पाळून त्यांना मनापासून साथ देतील, असे सांगतानाच त्यांना उमेदवारी मिळणार नसेल तर त्यांनी अम्हाला मदत करावी असे आवाहन करून माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
झावरे, दाते यांच्यासह खासदार दिलीप गांधी, विक्रमसिंह पाचपुते, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राजीव राजळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार आदी गुरुवारी एका कार्यक्रमात एकत्र आले होते. या कार्यक्रमात झावरे म्हणाले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत चेडे यांनी व्यवसायात मोठी प्रगती केली आहे. चेडे हे माझे नातेवाईक असले तरी ते बाजार समितीचे सभापती काशिनाथ दाते यांचे जवळचे मित्र आहेत. चेडे व्यवसायात जसे मोठे झाले आहेत तसे चेडे यांनी आता त्यांचे मित्र काशिनाथ दाते यांना राजकारणात मोठे करावे. झावरे यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागल्याचे संकेत या वक्तव्यातून मिळाले आहेत.
झावरे यांचे चिरंजीव राहुल हे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झाले. गेल्या वर्षभरात माजी आमदार झावरे यांनीही तालुक्यातील आपला संपर्क वाढविला आहे. अलीकडेच पार पडलेल्या मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांनीही तालुक्यात काँग्रेसची ताकद वाढविण्याचे सूतोवाच केले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत पारनेरची जागा काँग्रेसला मिळवून या जागेवर राहुल यांना उमेदवारी देण्याची काँग्रेसजनांची योजना लपून राहिलेली नाही. या पार्श्र्वभूमीवर झावरे यांनी वसंत चेडे यांच्या कार्यक्रमास हजेरी लावून राजकीय तडजोडीचे संकेत दिले. झावरे यांच्या या वक्तव्यामुळे तालुक्यात तो चर्चेचा विषय ठरला असून, राष्ट्रवादीतील इतर गट आता काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.