शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज कर्जत येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली.
तहसील कार्यालयासमोर झालेल्या या सभेस आमदार राम शिंदे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फाळके, राजेंद्र गुंड, संभाजीराजे भोसले, अंबादास पिसाळ, तालुकाप्रमुख बळीराम यादव, नामदेव राऊत, दीपक शहाणे, राजेंद्र देशमुख, किरण ढोबे, संजय भैलुमे, शब्बीर पठाण, प्रसाद शहा, नवनाथ तनपुरे, पिनू आटोळे, राजेंद्र बारटक्के आदी उपस्थित होते.
सकाळी गवंडेगल्ली येथून प्रथम शिवसेनेच्या वतीने ठाकरे यांच्या प्रतिमा घेऊन तहसील कार्यालयापर्यंत मूक फेरी काढण्यात आली व तिथे प्रतिमेचे पूजन करून नंतर सर्वपक्षीय शोकसभा घेण्यात आली. आमदार शिंदे म्हणाले, बाळासाहेबांसारखा नेता पुन्हा होणार नाही. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. फाळके म्हणाले, ठाकरे हे मराठी माणसाची अस्मिता होते. नामदेव राऊत यांनी यावेळी शिवसेनाप्रमुखांशी झालेल्या पहिल्या भेटीचा अनुभव सांगितला. सचिन पोटरे यांनी ठाकरे यांच्यावर शिवसैनिक किती व कसे प्रेम करतात, तसेच राजेंद्र देशमुख यांनी आजारी असतानाही ठाकरे यांना मातोश्रीवर भेटल्याचा अनुभव सांगितला. साळुंखे यांनी ठाकरे यांच्याप्रमाणेच प्रामाणिक राजकारण करण्याचा सल्ला दिला.
राजेंद्र गुंड, संभाजीराजे भोसले, अंबादास पिसाळ, प्रसाद शहा, नारायण दळवी, बिभीषण गायकवाड, रविंद्र दामोदरे, सुनील शेलार, अक्षय तोरडमल, सुरेश खिस्ती, नवनाथ तनपुरे यांची भाषणे झाली. या नंतर  सार्वजनिक श्रद्धांजली वाहण्यात आली.