काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी उपोषणास बसलेल्या महिलेला जातिवाचक शिवीगाळ केली होती. पण पोलिसांनी राजकीय दबावाखाली फिर्याद दाखल करून घेतली नाही. पोलिस उपअधीक्षक अंबादास गांगुर्डे यांनी अशोक बागूल व प्रकाश ढोकणे यांना राष्ट्रवादीचे सिद्धार्थ मुरकुटे यांच्या विरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीची खोटी फिर्याद देण्याचा सल्ला दिला. पोलिस ठाण्यात संगणकावर अर्ज तयार करण्यात आला, असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे सुभाष त्रिभुवन, संदीप मगर, सचिन ब्राम्हणे, महेंद्र साळवी, विठ्ठल गालफाडे यांनी केला.
 रमाबाई पटाईत या दलित महिलेने घरकुल मिळावे म्हणून महात्मा गांधी पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले होते. गांधी जयंतीच्या दिवशी ससाणे हे उपोषणार्थीवर धावून आले. त्यांनी जातिवाचक शिवीगाळ केली. त्याचे चित्रीकरण झाले आहे. निरीक्षक प्रकाश सपकाळे, प्रांताधिकारी प्रकाश थविल हे साक्षीदार आहेत. आम्ही पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेलो पण पोलिसांनी वरिष्ठांना विचारण्याचे सांगून टाळाटाळ केली. त्यामुळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कापसे व राष्ट्रवादीचे मुरकुटे यांना बोलावले, त्यामुळे पोलिस फिर्याद घेण्यास तयार झाले. मुरकुटे यांनी आम्हाला फूस लावलेली नाही. त्यांचा काहीही या प्रकरणाशी संबंध नाही. बागूल व ढोकणे यांनी ससाणे व आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या सल्ल्यावरून अ‍ॅट्रॉसिटीची फिर्याद दिली. पोलिस ठाण्यात गांगुर्डे यांनी त्यांना तसा सल्ला दिला. त्यामुळे पोलिस अधिका-यांचीही चौकशी करावी, अशी मागणीही या कार्यकर्त्यांनी केली.
    शहरातील वातावरण चांगले रहावे म्हणून आम्ही फिर्याद मागे घेतली. महिलेला घर देण्याचे आश्वासन देण्यात आले. घराच्या बांधकामाकरिता माजी उपनगराध्यक्ष अंजूम शेख व राजेंद्र सोनवणे यांनी ५० हजार रूपये दिले. सरकारकडून निधी आल्यानंतर हे पसे पदाधिकारी कापून घेणार आहेत. हे पसे शेख व सोनवणे यांचे नाहीत. उपोषणानंतर दलित कार्यकर्त्यांना दमबाजी सुरू झाली आहे. त्यामुळे आम्ही ससाणे यांच्या विरूद्ध न्यायालयात फिर्याद करणार आहोत. आम्हाला राज्यघटना कळते. कुणाच्या इशा-यावर आम्ही चालत नाही. समाजात किंमत नसलेले लोक ससाणे वापरतात. खोटय़ा तक्रारी केल्या जातात. ससाणे हेच खोटय़ा फिर्यादीमागे आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. दलाल कोण आहेत, हे सर्वाना माहित आहे. महिलेने उपोषण केले तेव्हा त्याची दखल पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी घेतली नाही. हसण्यावारी अधिकारी उपोषण नेत होते. दलितांची आमदार कांबळे व ससाणे चेष्टा करीत आहेत. दलितांवर अन्याय करणा-या अधिका-यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही दलित कार्यकर्त्यांनी केली.