शहरातील मुख्य रस्त्यावरून अवजड वाहनांमधून होत असलेली वाळू वाहतूक नागरिकांसाठी त्रासदायक झाल्याची तक्रार होत असूनही प्रशासनाकडून त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. आ. साहेबराव पाटील यांनीही या वाहतुकीवर आक्षेप घेत २४ जानेवारीला समन्वय बैठकीत ही वाहतूक शहराबाहेरून नेण्याचे निर्देश दिले असतानाही आमदारांच्या या मागणीलाही प्रशासनाने केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे.
आमदारांसह नागरिकांनी मागणी करूनही शहराच्या मुख्य रस्त्यावरून दररोज वाळूने भरलेली ३० ते ४० अवजड वाहने जाणे सुरूच आहे. या वाहतुकीमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. अवजड वाहनांमुळे तर या रस्त्याचे अक्षरश: तीनतेरा झाले आहे. धुळीचे प्रमाण वाढल्याने लहान वाहनधारकांना त्याचा त्रास होत असून शहरातील दगडी दरवाजाजवळ दररोज तासभर वाहतूक ठप्प राहात आहे.
मागील वर्षी वाळू वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनाने तालुक्यातील गांधली येथील उपसरपंचाचा बळी घेतला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. आ. पाटील यांनी २४ जानेवारी रोजी झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत वाळू वाहतुकीवर तीव्र आक्षेप घेत ही वाहतूक पारोळामार्गे वळविण्याची मागणी केली होती.