अतिरेक्यांचा सशस्त्र हल्ला झाल्यास व्हीआयपींना सुरक्षित कसे वाचवावे यासाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या स्पर्धेत मुंबईतील पोलीस नाईक आनंदा बापू वळवी (३५)प्रथम आले आहेत. वळवी मुंबईच्या विशेष सुरक्षा पथकात (स्पेशल प्रोटेक्शन युनिट) कार्यरत आहेत. त्यांच्या कौशल्याची दखल घेऊन त्यांना ‘नॅशनल सिक्युरिटी’च्या विशेष प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले आहे.
अतिमहत्त्वाच्या (व्हीव्हीआयपी) व्यक्तींना सुरक्षा प्रदान करण्यासाठी मुंबई पोलीस दलाचे स्पेशल प्रोटेक्शन युनिट (विशेष सुरक्षा पथक) कार्यरत आहे. अतिरेकी हल्ला झाल्यास या व्यक्तींचे संरक्षण करण्याबरोबरच त्यांना त्या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढण्याचे काम हे पथक करत असते. या पथकातील सर्वात निर्णायक भूमिका असते त्यांच्या वाहन चालकांची. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पथकातील पोलीस नाईक आनंदा बापू वळवी हेसुद्धा वाहन चालक. त्यांच्या कामातील धडाडी पाहून त्यांना विशेष प्रशिक्षणासाठी ‘नॅशनल सिक्युरिटी कमांडो’च्या मनेसर येथील प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले होते. राज्यातून निवड झालेले ते एकमेव पोलीस कर्मचारी होते. तेथील खडतर प्रशिक्षण पूर्ण करताना वळवी यांनी आपल्या कामाची चुणूक दाखविली होती. यावेळी त्यांच्यातील गुणवत्ता तपासण्यासाठी देशपातळीवर एक खडतर परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातील पोलीस दलातील जवान या स्पर्धेत होते. सशस्त्र दहशतवादी हल्ला झाला तर व्हीआयपींचा बचाव कसा करावा याचे प्रात्याक्षिक करून दाखवायचे होते. त्यावेळी  वळवी यांनी चहूबाजूंनी हल्ला होत असताना आपली गाडी सुरक्षित बाहेर काढली. त्यांच्या या कौशल्यामुळे संपूर्ण भारतातून ते पहिले आले.
  यासंदर्भात अतिरिक्त पोलीस आयुक्त (सुरक्षा) मधुकर पांडे यांनी सांगितले की, ही केवळ आमच्या पथकासाठी नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. वळवी यांच्यासारखे गुणवत्तावान जवान असल्याने मुंबईच्या या पथकाची शान वाढली आहे.
   आनंदा बाबू वळवी हे सध्या मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्यात चालक आहेत. स्पेशल प्रोटेक्शन फोर्समध्ये ५०० जवान असून त्यापैकी ५० चालक आहेत. हल्ला झाल्यास किंवा आणीबाणीची परिस्थिती उदभवल्यास या चालकांची खऱ्या अर्थाने कसोटी लागते. त्यामुळेच वळवी यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.