अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या नगर शाखेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ रंगकर्मी अनंत जोशी यांची निवड करण्यात आली. संस्थेची नवी कार्यकारिणी नुकतीच निवडण्यात आली. नगर शाखेचे मावळते सतीश शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या सभेत नवी कार्यकारिणी निवडण्यात आली. मध्यवर्ती संस्थेच्या नियामक मंडळावर प्रतिनिधी म्हणुन निवडून आलेले नगर शाखेचे माजी अध्यक्ष सतिश लोटके यांचा या सभेत सत्कार करण्यात आला. महानगरपालिकेचे रखडलेले नाटय़गृह, नाटय़ प्रशिक्षण शिबिरे, आंतरशालेय नाटय़ स्पर्धा, स्वस्त नाटक योजना, एकांकिका स्पर्धा आदी विषयांवर या सभेत तपशीलवार चर्चा झाली. मध्यवर्ती मंडळावर नगर शाखेला प्रतिनिधीत्व मिळावे अशा मागणीचा ठराव यावेळी करण्यात आला. अनंत जोशी यांनी आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच येत्या महिनाभरात नगरला ‘घाशीराम कोतवाल’ या व्यावसायिक नाटकाचा प्रयोग आणण्यात येईल असे सांगितले. तसेच राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी जाणाऱ्या नाटकाला आर्थिक सहाय्य करण्याची घोषणाही त्यांनी केली.   
सभेत निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. उपाध्यक्ष- रूपाली देशमुख, शैलेश मोडक, प्रमुख कार्यवाह- सतिश लोटके, खजिनदार- अमोल खोले, कार्यवाह- प्रसाद बेडेकर, सहकार्यवाह- श्रीराम कुलकर्णी, कार्याध्यक्ष- सतिश शिंगटे, जिल्हा संघटक- सुशांत घोडके, प्रसिध्दीप्रमुख- अविनाश कराळे, कार्यकारिणी सदस्य- संजय घुगे, शशिकांत नजन, राहुल भिंगारदिवे, शेखर वाघ, संजय लोळगे, सतिश काळे, प्रकाश पडागळे, शिवाजी कराळे, कुमार नवले, सुनिल राऊत, बाबासाहेब डोंगरे.