महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात, उर्दू शाळेत शिक्षकांची नेमणूक करावी, अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या वतीने सोमवारी महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली.
या सेलचे जिल्हाध्यक्ष हनिफ बशीर शेख आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या वेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन पालिका प्रशासनास सादर केले. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील रुग्णांचे हाल थांबविण्यासाठी तेथे पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. रुग्णालयात सोनोग्राफी मशीन, औषधे व डॉक्टर्स यांची उपलब्धता करावी, पालिकेच्या बडीदर्गा, मुलतानपुरा, वडाळा गाव, भारतनगर, सातपूर, नाशिकरोड येथील उर्दू शाळेत शिक्षकांची त्वरित नेमणूक करावी, भारतनगरमधील गोरगरिबांना म्हाडा योजनेतून बांधलेल्या व नेहरू पुनरुत्थान योजनेच्या सदनिका देण्यास प्राधान्य द्यावे, जेलरोड परिसरात दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, मनपा क्षेत्रातील दारिद्रय़रेषेखालील कुटुंबाची शहानिशा करून फेरसर्वेक्षण करून नव्याने दाखले देण्यात यावे आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. बगीचे व शौचालये यांची देखभाल करण्यासाठी स्थानिकांची नोकरभरती करण्यात यावी, कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, गोदावरी नदी व परिसर स्वच्छ-सुंदर राखण्याची आग्रही मागणी संघटनेने केली आहे. भारतनगरमधील शाळेत इयत्ता सातवीपर्यंत शिक्षणास मंजुरी देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी छाजेड व शेख यांनी केली आहे.