राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी व इतर शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर आंदोलन मागे घ्यावे, असे विनंतीवजा आवाहन सहकारातील जेष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यांनी केले.
विखे यांनी सांगितले की, राज्यात बहुतांश ठिकाणी दुष्काळसदृष परिस्थिती आहे. विहिरींची पाणीपातळी झपाटय़ाने खालावत असल्याने शेतातील उसाच्या उभ्या पिकांना पाणी देता येणे शक्य नाही. त्यामुळे उसाचे एकरी वजन घटण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच ऊस भावाच्या प्रश्नावरुन राज्याच्या साखरपट्टय़ात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. ऊस भावासाठी संघटनेच्या नेत्यांनी जरुर भांडण चालू ठेवावे, परंतु कारखान्यांचे गाळप बंद केल्यास त्यामध्ये शेतकऱ्यांचा आíथक तोटा आहे. ऊस भावाच्या प्रश्नात सरकारनेही हस्तक्षेप करावा, असे आवाहन विखे यांनी केले.
आंदोलनामुळे गळीत हंगामाचे दिवस वाया गेल्यास उसाचे टनेज कमी होईल, पर्यायाने वाळलेला ऊस कारखान्यांना गाळप करावा लागेल व जनावरेही वाळलेला ऊस खाणार नाहीत, असे स्पष्ट करुन विखे म्हणाले की, राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित व उसाचे टनेज कमी होवू नये यासाठी संघटनेच्या नेत्यांनी आंदोलन थोडे थांबवावे. ऊस गाळपाला उशीर होण्यात शेतकऱ्यांची आíथक व मानसिक हानी आहे. ऊस भावासंदर्भात संघटनेचे नेते, कारखानदार व सरकार यांच्यात वाटाघाटी चालू राहतील, परंतु ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेवून शेतकरी संघटनेने आंदोलन काही काळ थांबवावे, असे आवाहन विखे यांनी केले.