विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर जिल्ह्यातील ज्या मतदारसंघांमध्ये हमखास परिवर्तन घडू शकते, अशी दर्पोक्ती काही जणांकडून करण्यात येत होती. त्यात निफाडचा समावेश होता. यावेळी निफाडमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल कदम यांना घरी बसावे लागेल, असे अंदाजही काही जणांकडून व्यक्त करण्यात आले होते. परंतु जिल्ह्यातील इतर मतदारसंघांच्या तुलनेत अगदीच वेगळ्या प्रकारचे राजकारण खेळल्या जाणाऱ्या निफाडमध्ये सर्व प्रकारचे अंदाज, आडाखे मोडीत काढत कदम यांनी लागोपाठ दुसऱ्यांदा विजय मिळविण्याची किमया केली. मालोजीराव मोगल यांच्यानंतर या मतदारसंघात असे भाग्य कोणालाच लाभले नव्हते.
२००९ च्या निवडणुकीत तत्कालीन आमदार दिलीप बनकर यांच्याविरोधातील वातावरण..अनिल कदम यांच्यासारखा युवा उमेदवार..छगन भुजबळ यांच्याकडून मिळालेला छुपा पाठिंबा, या जोरावर कदम हे विजयी होतील असे वातावरण निर्माण झाले होते. झालेही तसेच. बनकर यांचा दणदणीत पराभव करून कदम विधानसभेत गेले. कदम यांचे शिक्षण, काका दिवंगत आमदार रावसाहेब कदम यांच्याप्रमाणेच आक्रमक शैलीत काम करण्याची पध्दत, यामुळे अनिल कदम हे तालुक्यात विकासाची गंगा आणतील असा निफाडकरांचा होरा होता. ग्रामीण भागातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांमध्येही ते स्थान मिळवतील असेही म्हटले जात होते. त्यांनी आपल्या शैलीत कामांना सुरूवातही केली. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या वीज मोटारी, रोहित्र नादुरूस्त झाल्यावर त्यांची दुरूस्ती किंवा नवीन रोहित्र बसविण्यासाठी जो काही कालापव्यय होत असे. त्याविरोधात कदम हे अधिकच आक्रमक झाले. त्वरीत काम न करणाऱ्या विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकाविण्याच्या तक्रारी त्यांच्याविरोधात येऊ लागल्या. तालुक्यातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांची कदमांविरोधात अशी ओरड सुरू झाली. प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या विरोधात जात असताना शेतकऱ्यांमध्ये मात्र ‘आपल्यासाठी भांडणारा नेता’ अशी त्यांची प्रतिमा तयार होत गेली. प्रामुख्याने गंगाथडी परिसरात रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रकार अधिक होतात.
सहनशक्ती अजिबातच नसल्याने शीघ्रकोपी स्वभावाने कदम यांनी पाच वर्षांच्या कालावधीत अनेकांना दुखविले असल्याने निवडणुकीत त्याचा फटका बसू शकतो, अशी सार्वत्रिक ओरड होती. कदम यांनी आपल्या स्वभावात किंचितसा जरी बदल केला तरी मतदारसंघावर ते अनेक वर्षे राज्य करू शकतात, अशी तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचीही भावना आहे. शिवाय तालुक्यात ज्या प्रकारची विकास कामे होणे आवश्यक होती. ती न होणे, तालुक्यातील रस्त्यांची बिकट अवस्था (उदाहरणार्थ पिंपळगाव ते निफाड) या कारणांमुळेही त्यांच्याविरोधात काही प्रमाणात नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळेच कदम यांचा पराभव अटळ असल्याचे म्हटले जात होते. परंतु निफाडच्या राजकारणाची जातकुळीच पूर्णपणे भिन्न आहे. इतर मतदारसंघांपेक्षा सर्वाधिक सुशिक्षित मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात गटातटाचे राजकारण कायमच प्रभावशील ठरत आले आहे. शिवाय इतर कोणत्याही मतदारसंघात जाणवणारा जातीयतेचा कंगोराही या मतदारसंघात होता आणि आहे. त्यामुळेच वरवर दिसणाऱ्या तरंगांवर  तालुक्यातील राजकारणाची खोली मापण्याचा कोणी प्रयत्न केल्यास तो हमखास चुकीचा ठरणार हे वास्तव आहे. तेच यावेळी झाले. असे असले तरी विजयाच्या धुंदीत न राहता मागील निवडणुकीपेक्षा यावेळी मताधिक्य का घटले, याचे आत्मचिंतन करण्याचा धडा या निकालाने कदम यांना नक्कीच दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिल कदम (शिवसेना, विजयी) ७८,१८६
दिलीप बनकर (राष्ट्रवादी) ७४,२६५
वैकुंठ पाटील (भाजप) १८०३१
राजेंद्र मोगल (काँग्रेस) ५,८७१
सुभाष होळकर (मनसे) १३६०

More Stories onनाशिकNashik
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil kadam get success in niphad constituency
First published on: 22-10-2014 at 08:26 IST