शहरातील विशिष्ट भागात दोन समूहांत वैरभाव एवढा कसा रुजला की पोलिसांना गोळीबार करावा लागतो, जमावापैकी काही जणांचा बळी जातो, पोलिसांसह अनेक जण जखमी व्हावेत. या सर्व घटना धुळेकरांसाठी अनाकलनीय वाटू लागल्या आहेत. यामुळे वैरभाव संपविण्याचे आव्हान आता सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती व प्रशासनासमोर ठाकले आहे.
भौगोलिकदृष्टय़ा विकासाला वरदान ठरू शकेल असा धुळे जिल्हा असल्याचे मत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अनेकदा मांडले आहे. जिल्ह्यातील काही विशिष्ट भाग वगळता अलीकडे तापी नदीवर सिंचन प्रकल्प अस्तित्वात आले आहेत. अनेक वर्षे ज्या प्रकल्पाच्या पूर्ततेची तालुकावासीयांना आस लागून होती तो अक्कलपाडा निम्न पांझरा प्रकल्प पूर्ततेच्या अंतिम टप्प्यात आला आहे. मनमाड-इंदूर या रेल्वे मार्गाची मागणी महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने विचारात घेतली आहे. दिल्ली-मुंबई हा प्रस्तावित इंडस्ट्रिअल कॉरिडॉर जिल्ह्याचे भवितव्य बदलवू शकणारा ठरणार आहे. असे सर्व सकारात्मक बदल घडत असताना धुळ्याची ओळख दंगलींचे शहर अशी होऊ लागल्याने विकासाच्या मार्गात त्याचा अडथळा निर्माण होत आहे.
शहराच्या सामाजिक, धार्मिक भावनांबद्दल भाष्य करण्यापेक्षा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. जवाहर पाटील यांनी पालक मंत्री सुरेश शेट्टी आणि अन्य लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत व्यक्त केलेल्या भावना राज्यकर्ते आणि प्रशासनानेही मनावर घ्यायला हव्यात. धुळे शहर आणि जिल्ह्यावर नैसर्गिक नव्हे तर मानवनिर्मित संकटेच अधिक आली आहेत. हे स्पष्ट करत अ‍ॅड. पाटील यांनी १९९२ च्या अयोध्येतील वादग्रस्त घटनेचा संदर्भ दिला. देशात सर्वत्र दंगली घडत असताना त्यावेळी धुळे कसे शांत होते, तेव्हा या शहरात वैरभाव का पसरला नाही, असा प्रश्न त्यांनी केला. साहजिकच तत्कालीन पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची भूमिका फलदायी ठरल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे हाताळणारे सुरेश खोपडे आणि त्यानंतरच्या काळात उसळलेल्या दंगली नियंत्रणात आल्यानंतर सुनील कोल्हे व शशिकांत शिंदे यांची कारकीर्द अ‍ॅड. पाटील यांनी मांडली. आर. के. सहाय, हिंमतराव देशभ्रतार यांनी हाताळलेल्या परिस्थितीचा आवर्जून उल्लेख केला.
संभाव्य दंगल थांबवू शकेल इतपत नैतिकता असलेल्या नेत्यांची शहरात वानवा असल्याने अखेर पोलिसांचे दंडुके हा पर्याय अंमलात येत आहे. यावेळी झालेली दंगल नियंत्रणात आली असून, आता कोम्बिंग ऑपरेशन करताना आणि प्रामुख्याने संशयितांना ताब्यात घेताना पुरेपूर पडताळणी होणे गरजेचे झाले आहे. भीषण दंगलीची झळ भोगलेल्या कुटुंबीयांनी त्यांची मानसिकता बदलवून खेळीमेळीचे वातावरण ठेवायला हवे. बाहेरील उपद्रवी व्यक्ती, त्यांचे वक्तव्य आणि अफवांकडे दुर्लक्ष करणे हिताचे आहे. दंगलग्रस्त भागास भेट देणारे वरिष्ठ नेते, प्रशासनातील अति उच्चपदस्थ अधिकारी यांच्या माध्यमातून विकासाला चालना मिळेल असे काहीतरी पदरी पाडून घेणे अपेक्षित आहे.