सखी मंडळाच्या वतीने येत्या ५ व ६ जानेवारी रोजी आंतरभारती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बंगळुरू ते इंदूपर्यंत विस्तारलेल्या सर्व शाखांतून दर दोन वर्षांनी सखी मंडळाचा मेळावा घेतला जातो. यंदा २२ वर्षांनंतर हा मान सोलापूरला मिळाला आहे.
सम्राट चौकातील श्राविका संस्था नगराजवळ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन धर्मशाळा येथे आयोजिलेल्या या दोन दिवसीय मेळाव्यात प्रसिध्द लेखिका, कलावंत, विचारवंतांना आमंत्रित करण्यात आले आहे. यात व्याख्याने, परिसंवाद व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याची माहिती सखी मंडळाच्या सोलापूर शाखेच्या सचिवा कल्पना कस्तुरे व राज पालिवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मेळाव्याचे उद्घाटक पुण्याच्या ‘अंतर्नाद’ चे संपादक भानू काळे हे आहेत. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सखी संवाद, तसेच  ‘महापुरुषांचे युग संपले आहे काय?’ या विषयावर परिसंवाद होणार आहे.  ६ जानेवारी रोजी गटचर्चा होईल. नंतर ‘प्रकाशाची बेटं’ हा विशेष कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या वाटचालीवर आधारित कार्यक्रम सादर होणार आहे. दुपारी तीन वाजता अभिनेते अतुल कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत आयोजिली आहे. यातील उद्घाटन सोहळा तसेच ‘प्रकाशाची बेटं’ हे दोन्ही कार्यक्रम सर्व स्त्री-पुरुषांसाठी खुला राहणार आहेत. तर उर्वरित कार्यक्रम सखी मंडळाच्या सदस्यांसाठी चालणार असल्याचे सचिवांकडून स्पष्ट करण्यात आले.