नागपूर येथे १९ डिसेंबर रोजी विधीमंडळ अधिवेशनस्थळी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मोर्चा काढण्यात येणार असून नाशिक जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने मोर्चासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले आहे.
मोर्चाच्या जनजागृतीसाठी आ. पाटील हे राज्याचा दौरा करत आहेत. येथील पक्ष कार्यालयात या निमित्ताने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांवर शासनाकडून गोळीबार करण्यात येतो. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे व हलाखीच्या परिस्थितीकडे डोळेझाक करण्यात येते. याचा जाब शासनाला विचारला पाहिजे. तो विचारण्यासाठी आपण सभागृहाबाहेर व सभागृहात संघर्ष करणार आहोत. मोर्चाद्वारे ऊस व कांदा उत्पादकांचे प्रश्न, अन्य शेतमालाचा भाव, दुष्काळग्रस्त, बेरोजगार व मच्छिमार तसेच वन्य जमिनीवरील अधिकार, यासंदर्भातील प्रश्नांना वाचा फोडण्यात येणार असल्याची माहितीही आ. पाटील यांनी दिली. मेळाव्यासमोर पक्षाचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड. मनिष बस्ते, केरू पाटील हगवणे, माजी नगरसेवक अ‍ॅड. जे. टी. शिंदे, पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्या सुजाता वाजे, कामगार नेते पी. बी. गायधनी यांनीही मार्गदर्शन केले.