पुणे शहराचा पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल तयार करताना महापालिका नागरिकांनाही सहभागी करून घेणार असून, या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांना करण्यात आले आहे.
पर्यावरण अहवालासंबंधी वाद-संवाद या कार्यक्रमाचे आयोजन नागरिकांच्या पुढाकाराने गेल्या आठवडय़ात करण्यात आले होते. पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणारे अनेक गट, तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. नागरिकांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात पर्यावरण अहवालावर अतिशय सकारात्मक चर्चा झाली. पर्यावरण अहवालाची गरज तसेच हा अहवाल तयार करण्याची प्रक्रिया, पर्यावरणावर परिणाम करणारे घटक, त्यांचे मूल्यांकन, पर्यावरण कार्यप्रवणता निर्देशांक या मुद्यांवर या कार्यक्रमात चर्चा झाली, असे अभिषेक वाघमारे आणि गुणेश परदेशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. वाघमारे व परदेशी हे या कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी आहेत. त्यांनी नागरिकांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. नागरिकांनी उपस्थित केलेले मुद्दे या वेळी विचारात घेण्यात आले तसेच त्यांचा समावेश पुढील अहवालात केला जाईल, असे आश्वासनही दिले आहे.     
यापुढे दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी पर्यावरण अहवाल तयार करण्यात नागरिकांना सहभागी होता येणार आहे. यात सहभागी होण्यासाठी वाघमारे यांच्याशी ९५५२००३९१८ या क्रमांकावर संपर्क साधावा.