महसुली रेकॉर्डला आवश्यक त्या नोंदी करून नवीन सात-बारा उतारा देण्याकरिता तीन हजार रूपये लाच स्वीकारणाऱ्या सिन्नर तालुक्यातील ठाणगांव सज्जा येथील तलाठी लक्ष्मीकांत दत्ताराम शिंदेला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौजे ठाणगाव शिवारातील शेती गट क्रमांक ८३७, १६१८, ९२१ ही तक्रारदाराची वडिलोपार्जीत शेती आहे. या गटाचे वाटणीपत्र होऊन शेती तक्रारदार व त्यांच्या आईच्या हिश्यास आली होती. त्यानुसार महसूली रेकॉर्डला त्यांचे व आईचे नांव लावून नवीन सात-बारा उतारा देण्यासाठी तलाठी शिंदे यांनी तीन हजार रूपयांची लाच मागितली. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर हा सापळा रचण्यात आला. बुधवारी संगमनेर जकात नाका रोडलगत एका हॉटेलमध्ये हे पैसे स्वीकारत असताना शिंदेला पथकाने ताब्यात घेतले. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक एस. के. शिंदे, पोलीस निरीक्षक एस. एन. देशमुख, पोलीस निरीक्षक अस्लम शेख आदींच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. दरम्यान, कोणत्याही शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी वा त्यांच्यावतीने कोणी खासगी व्यक्ती लाचेची मागणी करीत असतील, तर नागरिकांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाशी ९१५८२ ४२४२४, ०२५३ – २५७५६२८, २५७८२३० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.