वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या नागरिकाने आपल्यालाच पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रभाकर माणिकराव सूर्यवंशी (वय ४२, रा. चैत्रांगण सोसायटी, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलीस अधिकारी राऊत, कर्मचारी केंद्रे, कुंभार आणि आणखी एकावर मारहाण, शिवीगाळ, धमकावणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या सोमवारी सूर्यवंशी हे बुधवार पेठेतील जोगेश्वर मंदिरासमोरील रस्त्यावरून जात असताना त्यांनी या ठिकाणी बॅरीकेट का लावले याची विचारणा केली. सूर्यवंशी प्रवेश नसताना आल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे कागदपत्रे मागितली. त्यांच्याकडे पीयूसी प्रमाणपत्र नसल्यामुळे पोलिसांनी एक हजार रुपयांचा दंड घेतला, पण पावती दिली नाही. त्यावरून झालेल्या वादानंतर पोलिसांनी त्यांना मारहाण करत विश्रामबाग वाहतूक पोलीस चौकीत घेऊन गेले. तिथे राऊत व कुंभार या पोलिसांनी त्यांना पट्टय़ाने व काठीने मारहाण केली. तसेच, जिवे मारण्याची व बलात्काराच्या गुन्ह्य़ात अडकवण्याची धमकी दिली.
याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले की, सूर्यवंशी यांनी त्यावेळी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यामुळे त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी त्यांनी पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केली नाही.
न्यायालयातून जामीन घेतल्यानंतर तक्रार दिली आहे. या गुन्ह्य़ात गंभीर दुखापतीचे जे कलम लावले आहे त्याची शहानिशा करून ते लावता आले असते. पोलीस तपासानंतर खरे काय समोर येईल.