टारगटांच्या दहशतीखाली सापडलेल्या येथील के. टी. एच. एम. महाविद्यालयातील तब्बल २५ हजार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अखेर मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण दूषित होण्यास महाविद्यालय समोरील ‘पोलीस बॉईज्’ आणि मल्हारखाण परिसरातील टवाळखोर कारणीभूत असल्याचा आरोप संस्थेने केला आहे. या संदर्भात पोलीस यंत्रणेला सूचित करतानाच गंगापूर रस्त्यावरील महाविद्यालयांच्या सभोवतालच्या संरक्षक भिंतीची उंची वाढविणे, होमगार्डची नियुक्ती, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गणवेशात बदल करून ओळखपत्र बंधनकारक करणे, शालेय विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्रवेशद्वार, असे वेगवेगळे उपाय हाती घेण्यात येणार आहेत.
सोमवारी केटीएचएम महाविद्यालयातील बास्केटबॉल मैदानाच्या परिसरात दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता लक्षात घेऊन संस्थेने या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मविप्र’ शिक्षण संस्थेचा जिल्ह्यात सर्वदूर पसारा असला तरी शहरातील गंगापूर रस्त्यावर एकाच ठिकाणी असणाऱ्या विविध महाविद्यालये व शाळांचा परिसर हा महत्वपूर्ण केंद्रबिंदू. या एकाच ठिकाणी केटीएचएम कला, शास्त्र व विज्ञान महाविद्यालय, त्यालगत मराठा हायस्कूल, आयएमआरटी व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय, शिक्षण व अध्यापकशास्त्र महाविद्यालय, जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, अभिनव बालविकास मंदिर, बीबीए महाविद्यालय कार्यरत आहेत. या परिसरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या २५ हजाराच्या  आसपास आहे. एकाच ठिकाणी सामावलेली वेगवेगळी महाविद्यालये टवाळखोरांसाठी जणू नंदनवन ठरल्यावर ‘नाशिक वृत्तान्त’ने  काही दिवसांपूर्वी प्रकाशझोत टाकला होता. महाविद्यालय परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या हाणामारीच्या घटनेचा जाच त्या प्रकाराशी संबंध नसणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. टोळक्यामार्फत मारहाण सुरू झाल्यावर परिसरात एकच गोंधळ उडाला. त्यात सहा विद्यार्थी जखमी झाले. काही विद्यार्थिनींनाही हत्याराने जखमा झाल्याचे सांगितले जाते. रामवाडी, मल्हारखाण व पोलीस वसाहतीतील युवकांचा या परिसरात चांगलाच बोलबाला असून त्यांच्यामार्फत दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे.
या संदर्भात मविप्र शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनीही विद्यार्थ्यांच्या भावनेशी सहमती दर्शविली. मल्हारखाण व पोलीस वसाहतीतील टारगट युवकांचा जाच नेहमीचा आहे. त्या परिसरातील जे तडिपार गुंड आहेत, त्यांच्या मुसक्या बांधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या जाचाविषयी संस्थेने पोलीस यंत्रणेलाही सूचित करून विद्यार्थ्यांना सुरक्षितता प्रदान करण्याची मागणी केल्याचे नमूद केले. या प्रश्नावर संस्थेने काही उपाय करण्याचे निश्चित केले आहे. त्या अंतर्गत संस्थेच्या आवारातील सुरक्षा व्यवस्था होमगार्डच्या सहाय्याने बळकट केली जाईल. सद्यस्थितीतील खासगी सुरक्षा रक्षकांची संख्या केवळ २२ आहे. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत सुरक्षारक्षकांची संख्या अतिशय कमी असल्याने बाहेरील तरूणांचा उच्छाद रोखणे अवघड ठरल्याची बाब यापूर्वीच ‘कुठे आहे महाविद्यालयांची सुरक्षितता ?’ या मालिकेदरम्यान ‘नाशिक वृत्तान्त’ने उघड केली होती. सुरक्षिततेसाठी होमगार्डची मागणी संस्थेने केली आहे.
तसेच संस्थेच्या सभोवतालच्या संरक्षक भिंतीची उंची वाढविली जाणार आहे. बाहेरून कोणाला परिसरात प्रवेश करता येऊ नये म्हणून खर्चिक असले तरी हे काम हाती घेतले जाणार आहे. मल्हारखाणलगत असणाऱ्या भागात भिंतीच्या कामावेळी अडथळे येऊ शकतात. त्यामुळे तेव्हा पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी संस्था करणार आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पुढील वर्षांपासून गणवेश बदलण्यात येणार आहे. तसेच प्रत्येकास ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले. परिसरातील केटीएचएम महाविद्यालय व मराठा हायस्कूल यांच्यात संरक्षक भिंत नसल्याने दोन्ही ठिकाणचे विद्यार्थी परस्परांच्या इमारती व परिसरात भ्रमंती करू शकतात. त्यामुळे महाविद्यालयीन व शालेय जीवनात जो फरक असतो त्या सीमा पुसल्या गेल्या आहेत. जवळपास पाच हजार शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन जीवन किती रंगीन असते, याची अनुभूती दररोज जवळून घेत आहेत.
हे लक्षात घेऊन संस्थेने आता शाळेसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पवार यांनी दिली. अंतर्गत भागात कोणत्याही वाहनास प्रवेश दिला जात नाही. वाहनांच्या पार्किंगची व्यवस्थाही स्वतंत्रपणे करण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली.