बहुचर्चित अंबिका डुक्रे खून प्रकरणातील मुख्य आरोपी अनिल पवार याच्यावर सुडाने पेटलेल्या अंबिकाच्या भावाने न्यायालयाच्या आवारातच मंगळवारी खुनी हल्ल्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून पुढे आलेला पुणे येथील पोलीस कर्मचारी यात जखमी झाला. हल्लेखोरास अटक करण्यात आली असून शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर आसाराम डुक्रे (वय-२०, रा. रस्तापूर, ता. नेवासा) असे हल्ला करणा-याचे नाव आहे. नेवासे तालुक्यातील रस्तापूर येथील बहुचर्चित अंबिका डुक्रे खून प्रकरणातील आरोपी अनिल जगन्नाथ पवार हा सध्या कोपरगाव व अकोले येथील बलात्कार व खून प्रकरणात पुणे येथील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. आज डुक्रे खून प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात होती. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश शरद कुलकर्णी यांच्यासमोर सुरू आहे. आज सरकारी वकील बी. एल. तांबे यांनी पवार याचा जबाब घेतला.
सुनावणीनंतर पुणे शहर मुख्यालयातील हवालदार अविनाश महादेव भोसले (बिल्ला नं. १०३०), पोलीस नाईक एस. एस. धराडे, पोलीस शिपाई प्रशांत जामदार यांच्यासमवेत पवार न्यायालयाच्या आवारातून जात होता. याच दरम्यान मृत अंबिका डुक्रे हिचा लहान भाऊ सागर याने अचानक हातातील मिरची पूड पवार याच्या डोळ्यांत फेकली व दुस-या हातातील चाकूने पवार याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हवालदार भोसले यांनी प्रसंगावधान राखून पवार यास ढकलले व सागर यास झडप घालून जेरबंद केले. मात्र या झटापटीत सागरच्या हातातील चाकू भोसले यांच्या डाव्या हाताच्या अंगठय़ाला लागला, त्यामुळे भोसले जखमी झाले.
अकोले व कोपरगाव येथील बलात्कार व खून प्रकरणात पवार हा सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. या शिक्षेदरम्यान पॅरॉलवर सुटलेला असताना दि. २ सप्टेंबर २००६ रोजी पवार याने रस्तापूरच्या अंबिका डुक्रे या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला होता. तेव्हापासून तो पुन्हा पसार झाला. पोलिसांनी मोठय़ा शिताफीने त्यास जेरबंद केले होते.