तामिळनाडू व कर्नाटक राज्याच्या धर्तीवर पंपावरून एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये भरून द्यावा आणि ग्राहकांची सोय करावी, अशी मागणी पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब धुमाळ यांनी केंद्रीय पेट्रोलमंत्र्यांकडे केली आहे.
नागरिकांना सहा किंवा नऊ सिलिंडर देण्याच्या सरकारच्या धोरणाबाबत अडचण वाटल्याचे सांगत धुमाळ यांनी हा पर्याय सुचवला आहे. ज्या पंपांवर एलपीजी गॅस वाहनांसाठी भरला जातो, तोच गॅस घरगुती वापरासाठी दिल्यास ग्राहकाला स्वस्त व किफायती दरात मिळेल व गॅसचा तुटवडाही भासणार नाही. याकरिता पंपावर पेट्रोलियम कंपन्यांमार्फत सिलिंडरमध्ये एलपीजी गॅस भरून देण्यासाठी वेगळी ‘नोझल्स’ बसवून दिल्यास गरजेनुसार गॅस घेणे शक्य होणार आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने यावर उपाय शोधला आहे. छोटय़ा टँकरद्वारे तामिळनाडू व कर्नाटक राज्यांत ग्रामीण भागातील नागरिकांना गरजेनुसार सिलिंडरमध्ये एलपीजी गॅस भरून दिला जातो, त्या धर्तीवर तीनही सरकारी कंपन्यांना तसे आदेश देऊन ग्राहकांची सोय करून द्यावी, अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.