शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्याचे वृत्त आल्यानंतर शनिवारी सायंकाळपासून उत्स्फुर्तपणे बंद झालेली सर्व दुकाने दोन दिवसानंतर म्हणजे सोमवारी सकाळी उघडली गेली. शिवसेनाप्रमुखांना श्रध्दांजली वाहण्यासाठी राज्यस्तरीय व्यापारी संघटनेने सोमवारी बंदची हाक दिली होती. तथापि, त्या बंदमध्ये शिवसेना सहभागी नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रमुख बाजारपेठेतील बहुतेक व्यवहार पूर्ववत सुरू झाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे व्यापारी संघटनेच्या बंदला नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. दरम्यान, ठिकठिकाणी विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांतर्फे शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर कोणीही आवाहन केले नसताना, कोणी मोर्चा काढला नसताना नाशिकसह धुळे, जळगाव व नंदुरबार शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांनी सलग दोन दिवस आपले सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेऊन बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. या काळात केवळ शहरी भाग नव्हे तर ग्रामीण भागातील छोटी-मोठी दुकानेही पूर्णपणे बंद होती. नाशिक शहरातील प्रमुख रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट पसरल्याचे पहावयास मिळाले होते. त्यातच, रविवारी सायंकाळी राज्याच्या एका व्यापारी संघटनेने सोमवारी दुकाने बंद ठेवून हा श्रद्धांजली दिन म्हणून पाळण्याचे आवाहन केले होते. परंतु, या बंदला आमचा पाठींबा नसल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेने दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी सोमवारी आपले व्यवहार सुरू करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे दोन दिवसांच्या उत्स्फुर्त बंदनंतर सोमवारी दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आले. बंद असणारी दुकानेही उघडली गेली. शासकीय व खासगी कार्यालयांचे कामकाजही सुरू झाल्याने प्रमुख मार्गावर नेहमीसारखी वर्दळ सुरू झाली. मेनरोड, शालिमार, महात्मा गांधी रोड यासारख्या प्रमुख बाजारपेठा असणाऱ्या रस्त्यांवर दिवाळीच्या काळात ग्राहकांची जशी गर्दी होती, तशीच गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. कापड बाजार, धान्य बाजारासह अन्य किरकोळ दुकानेही नियमितपणे सुरू झाली. शिवसेनाप्रमुखांच्या निधनामुळे बंद ठेवण्यात आलेले कॉलेजरोड, उंटवाडीरोड व नाशिकरोड परिसरातील मॉल्स व चित्रपटगृहे सोमवारी उघडण्यात आली. मल्टिप्लेक्स चित्रपटगृहातील नियमित ‘शो’ सुरू झाले.
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात विविध सामाजिक संघटना, संस्था यांच्यातर्फे शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. पिंपळगाव बसवंत व येवला येथे सोमवारी आयोजित सभेत बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दिंडोरीत मंगळवारी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रामीणचे जिल्हाप्रमुख अर्जुन टिळे यांनी दिली. धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभांचे आयोजन करण्यात येत आहे.