संगीत नाटकांतील नाटय़पदे आणि अभिनयामुळे मराठी रंगभूमीवर सुवर्णयुग निर्माण करणारे बालगंधर्व आणि शास्त्रीय संगीताबरोबरच संतवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांवर आपल्या आवाजाचे गारुड करणारे पं. भीमसेन जोशी या दोघांचीही गायनशैली पूर्णपणे वेगळी होती. प्रसिद्ध गायक आनंद भाटे हा या दोघांना जोडणारा समान धागा आहे. ‘प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन’तर्फे २७ फेब्रुवारी रोजी बोरिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर अमृताचे’ या कार्यक्रमात भाटे या दोन्ही गायकांच्या गायकीचे दर्शन श्रोत्यांना घडविणार आहेत.
लहानपणापासून बालगंधर्व यांची गाणी गाणाऱ्या भाटे यांना लोक ‘आनंद गंधर्व’ म्हणून ओळखतात. पुढे आनंद भाटे यांनी पं. भीमसेन जोशी यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतले. ‘स्वर अमृताचे’ या कार्यक्रमातून श्रोत्यांना या दोन दिग्गज गायकांच्या गायकीचे दर्शन घडविण्याचा, त्यांच्या स्वरांची अनुभूती देण्याचा आणि त्यांना सांगितिक आदरांजली वाहण्याचा आपला प्रयत्न असल्याचे भाटे यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले.
या दोघांच्या गायनाची शैली पूर्णपणे वेगळी असली तरी दोघांच्याही गाण्यात सुरांना आणि सुरेल गायकीला खूप महत्त्व होते, असे सांगून भाटे म्हणाले की, कार्यक्रमात सुरुवातीला बालगंधर्वाची नाटय़पदे तर उत्तरार्धात पं. भीमसेन जोशी यांच्या बंदीशी, त्यांनी तयार केलेले राग, चित्रपटासाठी म्हटलेली गाणी आणि शेवटी संतवाणी सादर करणार आहे. तसेच दोन गाण्यांच्या मध्ये या दोघांच्या गायकीची वैशिष्ठय़े, आठवणी यांनाही आपण उजाळा देणार आहोत. कार्यक्रमाची संहिता प्रवीण जोशी यांची तर निवेदन राजेश दामले यांचे आहे. हा कार्यक्रम दुपारी ४.०० वाजता बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात होणार आहे.