मराठी मनावर गेली चार दशके अधिराज्य गाजविणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक सोलापुरात उभारण्याचा ठराव महापालिका सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर झाला. महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असूनदेखील पक्षीय मतभेद बाजूला ठेवून दिवंगत शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला हे येथे उल्लेखनीय. या ठरावात स्मारकासाठी लागणारी जागा, खर्च आदींची तातडीने तरतूद करून प्रत्यक्ष कामाचा प्रारंभ करण्यात येणार असल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे सोलापुरात उभारले जाणारे स्मारक पहिलेच असण्याचा अंदाज आहे.
पार्क जिमखान्याजवळ चार हुतात्मा पुतळ्यांच्या मागे व सोलापूर श्रमिक पत्रकार संघासमोरील खुल्या जागेत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आहे. राज्यातील पहिले स्मारक सोलापुरात व्हावे अशी इच्छा महापौर अलका राठोड यांनी व्यक्त केली. याशिवाय सात रस्ता परिसर चौकात बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.
महापौर राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिवंगत शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल दुखवटा व्यक्त करण्यात आला. याचवेळी सभागृह नेते महेश कोठे यांनी बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव मांडला. त्यास विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर यांच्यासह सर्व पक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. तेव्हा हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाल्याचे महापौर अलका राठोड यांनी जाहीर केले.
यावेळी शिवसेनाप्रमुखांच्या निधनाबद्दल मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावावर अनेक नगरसेवकांनी भाषणे केली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्राची जन्मकथा महेश कोठे यांनी सांगितली. माढय़ाचे दिवंगत पत्रकार वसंत कानडे हे पूर्वी ‘सामना’ नावाचे साप्ताहिक चालवायचे. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांना याच नावाने वृत्तपत्र काढायचे होते. परंतु वृत्तपत्र नोंदणीकरणास तांत्रिक अडचण येत होती. तेव्हा सामना हे नाव मिळवून देण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी तत्कालीन अर्थमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना विनंती केली. शिदे यांनी ही जबाबदारी सोलापुरातील आपले संपर्क कार्यालय प्रमुख विष्णुपंत कोठे यांच्याकडे सोपविली. त्यानुसार कोठे यांनी माढय़ात वसंत कानडे यांच्याशी संपर्क साधून ‘सामना’ हे नाव शिवसेनाप्रमुखांना मिळवून देण्यात सहयोग दिला. बाळासाहेबांचे सुशीलकुमारांवर विलक्षण प्रेम होते.
त्यांना ते नेहमीच ‘जावई’ असेच म्हणायचे. शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या विरोधात विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार उभा केला नव्हता, अशी आठवण महेश कोठे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे यांनी बाळासाहेबांचा उल्लेख खरा ‘सेक्युलर नेता’ असा केला. यावेळी विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर यांच्यासह भाजपच्या प्रा. मोहिनी पत्की, प्रा. अशोक निंबर्गी, बसपाचे आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे गटनेते दिलीप कोल्हे, माजी महापौर आरीफ शेख, मधुकर आठवले, देवेंद्र कोठे, चेतन नरोटे, संजीवनी कुलकर्णी, शिवसेनेचे भीमाशंकर म्हेत्रे, लक्ष्मण जाधव आदींनी दिवंगत सरसेनापतींना भावपूर्ण शब्दात श्रध्दांजली वाहिली. महापौर अलका राठोड यांनी बाळासाहेबांच्या निधनामुळे मराठी माणसांचे खूप मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2012 रोजी प्रकाशित
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक सोलापुरात उभारणार
मराठी मनावर गेली चार दशके अधिराज्य गाजविणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक सोलापुरात उभारण्याचा ठराव महापालिका सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर झाला.
First published on: 22-11-2012 at 04:44 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bal thackreys memorial to build in solapur