शिवसेनाप्रमुखांनी ज्या ज्या ठिकाणी स्वत: काही कार्यक्रमांच्या निमित्ताने भेट दिली, सभा घेतल्या, त्या ठिकाणी शिवसेना फोफावत गेली हा इतिहास आहे. ठाणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक ही त्याची उदाहरणे म्हणून सांगता येतील. नाशिकजवळील भगूरचेही तसेच. शिवसेनाप्रमुखांनी स्वत: ४२ वर्षांपूर्वी दिलेला शिवाजी महाराजांचा पुतळा आजही शिवाजी चौकात दिमाखात उभा आहे. विशेष म्हणजे या पुतळ्याचे अनावरण स्वत: बाळासाहेबांनीच केले होते. त्यानंतर काँग्रेसला मानणारी भगूरची मंडळी नंतर मात्र शिवसेनेकडे वळली.
मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी आणि प्रगतीसाठी लढणारी चैतन्यमय आणि संघर्षशील संघटना म्हणून १९६६ मध्ये मुंबईमध्ये शिवसेनेची स्थापना झाली. बाळासाहेबांच्या धारदार व आक्रमक वक्तृत्वाने अवघे मराठीजन भारावून गेले होते. जाहीर सभा, मेळावे, आंदोलन, यांच्या माध्यमातून बाळासाहेबांना मिळणाऱ्या प्रतिसादात दिवसेंदिवस वाढच होत होती. ठाणे, मुंबईपुरता शिवसेनेचा हा झंझावात मर्यादित राहू नये म्हणून दोन डिसेंबर १९६८ रोजी काकासाहेब सोलापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली भगूर येथे शिवसेना शाखा सुरू करण्यात आली. शाखेच्या उद्घाटनानंतर २३ जानेवारी १९७० रोजी बाळासाहेबांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. हाच दिवस त्यांचा वाढदिवसही. मग वाढदिवस, जाहीर सभा आणि शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण, असा त्रिवेणी संगम जुळून आला. पुतळ्याचे अनावरण बाळासाहेबांच्या हस्तेच झाले. जाहीर सभेस मीनाताई ठाकरे, वि. मा. पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती.
भगूर येथील शाखेच्या माध्यमातून सुरू झालेली शिवसेनेची वाटचाल आणि विस्तार नाशिकमध्ये अखंड सुरूच राहिला.
 सोलापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली भगूर शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात शाखाप्रमुख म्हणून खंडेराव शिंदे, उपशाखाप्रमुख भगीरथ जाधव, कोषाध्यक्ष विठ्ठलराव दिवटे, कार्याध्यक्ष गोटीराम चौधरी, कार्यवाह जगन्नाथ गणोरे, सदस्य बहिरुजी करंजकर, किसन ताजनपुरे, प्रभाकर जाधव, ईश्वरलाल ठाकूर आदींचा समावेश होता. त्यावेळी मुंबईमध्ये सभा आणि मेळाव्यांना नाशिकमधून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक जात असत, असे वडिलांकडून कळत गेले, अशी माहिती सुनील जाधव यांनी दिली. सुनील जाधव यांचे वडील म्हणजे भगूरच्या पहिल्या शाखेचे उपप्रमुख भगीरथ जाधव होय. सध्या वडिलांची प्रकृती ठीक नसल्याचेही त्यांनी सांगितले.