स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच देशातील आठ कोटी बंजारा समाजाचा एक प्रतिनिधी केंद्रीय राज्यमंत्री झाला. त्या अनुषंगाने बंजारा समाजाची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. दुर्लक्षित समाजाबरोबरच बंजारा समाजालाही सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नरत राहणार असल्याची ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पी. बलराम नायक यांनी मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे बुधवारी दिली.
बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी येथे दिवाळीच्या पाडव्याला यात्रा भरते. या यात्रेदरम्यान देवी जगदंबा, संत सेवालाल महाराज व तपस्वी संत डॉ. रामराव महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पी. बलराम नायक पोहरादेवी येथे आले. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या दुर्लक्षित बंजारा समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून केंद्र सरकारमध्ये मला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामुळेच स्थान मिळाले. त्याचा फायदा या दुर्लक्षित समाजाला न्याय देण्यासाठी करेल. आपल्या इतरही समस्या अग्रक्रमाने सोडवण्यासाठी पुढाकार घेईल. जिल्ह्य़ात ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने आपण कोणतेही आश्वासन देणार नाही. फक्त दर्शनासाठीच पोहरादेवी येथे आलो होतो, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मखराम पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून संत रामराव महाराज, आंध्र प्रदेशचे माजी मंत्री अमरसिंग तिलावत, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड, बाबुसिंग नाईक, सुभाष भानावत, बाबुसिंग महाराज, संजय महाराज, बलदेव महाराज, नेहरू महाराज, देवराव राठोड आदी उपस्थित होते. याप्रसंगी संत रामराव महाराज यांनी आपल्या आशीर्वादपर भाषणात संत सेवालाल महाराज यांचे बोल खरे ठरत असून दिवाळीच्या दिवशी मी येणार, असे म्हटले होते. त्या अनुषंगाने देशाच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पी. बलराम नायक दिवाळीच्या पाडव्याला पोहरादेवी येथे दर्शनासाठी आले. ते येथे आल्याने समाजबांधवांच्या आशा
पल्लवीत झाल्या असून त्यांच्या रूपाने समाजाला निश्चितच न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली. या वेळी कवी रामराव भाटेगावकर, अमरसिंग तिलावत, डॉ. टी. सी. राठोड, मखराम पवार यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.  संजय चव्हाण यांनी केले.