वित्तपुरवठा करणाऱ्या अनेक बँका, संस्थांमध्ये जामीनदार अनिवार्य असून कर्ज घेणारे खातेदार आपले नातेवाईक, मित्र यांना जामीनदार म्हणून सादर करीत असल्याचे सर्वश्रुत आहे; मात्र जामीनदारासाठी दिलेल्या कागदपत्रांचा दुरुपयोग करण्याचे प्रकार वाढले असल्याचे दिसून येत आहे. कर्जदाराने वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांचे कर्ज वेळीच न फेडल्यास जामीनदारावर गंडांतर येण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे मित्र, मैत्रीण, नातेवाईक यांना जामीन राहत असाल तर जरा सांभाळून, असा सल्ला पोलीस आता देऊ लागले आहे.
तात्काळ कर्ज उपलब्ध करून देणारे अनेक लघुसंदेश प्रत्येकाच्या मोबाइलवर दररोज फिरत असतात. कर्ज देण्यासाठी मध्यस्थाची भूमिका पार पाडणाऱ्या फ्रँचायजी तर शहरात पदोपदी दिसून येत आहेत. या फ्रँचायजीचे प्रतिनिधी कर्ज घेणारे ‘बकरे’ शोधत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. असा बकरा गळाला लागला की अमुक अमुक बँकेतून हवे तेवढे कर्ज देण्याचे आमिष दाखविले जाते. त्यासाठी घरी, नोकरीच्या ठिकाणी येऊन तुमची सर्व कागदपत्रे घेतली जातात. कर्ज गेल्याशिवाय बँकांचा धंदा नाही. त्यामुळे लघुउद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देणारी एक मोठी साखळी बाजारात सध्या फिरत आहे.
कर्जदार किंवा जामीनदाराने दिलेल्या अशा प्रकारच्या कागदपत्रांचा नंतर दुरुपयोग केला जात असल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी बोगस सह्य़ा केल्या जात असतात. या कामी काही बँकेचे कर्मचारी अधिकारी यांचे संगनमत झाले असल्याची बाबही पुढे आली आहे. मुंबई पालिकेच्या मुलुंड येथील वाहन कार्यशाळेत काम करणारे कर्मचारी मुकेश निकम हे दोन वर्षांपूर्वी आपले नातेवाईक नितीन निकम यांच्यासाठी कुर्ला येथील एका बँकेत जामीनदार राहिले.
नितीन निकम यांनी या बँकेतून बदलापूर येथील घरासाठी ११ लाख रुपये कर्ज घेतले. नितीन विविध बँकांची कर्जे करून देण्याचे काम करीत असल्याने त्याच्यावर अविश्वास दाखविण्याचा प्रश्न आला नाही. त्यामुळे त्यांच्या विनंतीवरून मुकेश यांनी जामीनदार म्हणून लागणारी सर्व कागदपत्रे नितीनकडे दिली. यथावकाश नितीनचे कर्ज मंजूर होऊन त्याने बदलापूरच्या घराचा ताबादेखील घेतला; मात्र त्यानंतर गेली दोन वर्षे नितीनने बँकेचा एक रुपयादेखील भरला नाही. त्यामुळे बँकेच्या नियमानुसार जामीनदाराचे बँकेने खाते सील केले आणि त्यातील नऊ लाख रुपये काढून घेतले.
मुकेश यांनी हे पैसे नवीन घर घेण्यासाठी साठवले होते. नातेवाइकाच्या पराक्रमामुळे एका क्षणात मुकेश यांच्यावर उपासमारीची वेळ आली. ऑगस्ट २०१३ पासून त्यांच्या पगारातून काही रक्कम बँक काढून घेत आहे. काही काळ बँकेने हे सील उठविले होते, पण ते पुन्हा सील करण्यात आल्याने मुकेश हतबल झाले आहेत.
या सर्व घडामोडीत एक नवीन गौडबंगाल उघडकीस आले असल्याचे रबाले पोलिसांनी सांगितले. मुकेश यांनी दिलेली जामीनदाराची कागदपत्रे दुसऱ्या एका कर्जदाराला देऊन नितीनने त्याच्या नावावर एक लाख रुपयांचे दुसरे कर्ज काढले. त्यासाठी मुकेशच्या खोटय़ा सह्य़ा मारण्यात आल्या आहेत. अशा प्रकारचा झोल नितीनने अनेक बँकांत केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्याला मुंबई आणि नवी मुंबई पोलीस एकाच वेळी शोधत आहेत. या सर्व फसवाफसवीमध्ये बँकेचे कर्मचारीदेखील सामील असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजात अशा घटना घडत आहेत. वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था किंवा बँकांनी जामीनदाराची कर्जदाराएवढीच खातरजमा करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी अनेक बँकांमध्ये विधी अधिकारी नेमण्यात आले आहेत. जामीनदाराने आपली कागदपत्रे अशी कोणत्याही मध्यस्थाकडे न देता थेट बँकेत द्यावीत. त्यामुळे अशा फसवणुकींना आळा बसू शकेल.
सुरेश मेंगडे, उपायुक्त, गुन्हे अन्वेषण

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank employee officer involved in misusing of guarenter document
First published on: 19-09-2014 at 01:59 IST