राज्यात डान्स बारवर घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवल्याचा मुद्दा सध्या गाजत असताना इकडे सोलापुरात ऑर्केस्ट्रा बारमधील एका बारबालेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना घडली. घटनेनंतर पलायन केलेली बारबाला तिचा प्रियकर व अन्य दोघा साथीदारांचा सोलापूर तालुका पोलीस शोध घेत आहेत.
हैदराबाद रस्त्यावर मुळेगाव शिवारात राजश्री ऑर्केस्ट्रा बार (पूर्वीचा डान्स बार) सुरू असून यात रीना ऊर्फ किरण व्हिक्टर इमिलियस (वय २४) ही गायिका म्हणून सेवेत असताना तिच्याशी गुलबर्गा जिल्हय़ातील गाणगापूर येथील उस्मान नावाच्या तरुणाबरोबर ओळख होऊन त्याचे रूपांतर प्रेमात झाले. रीना ही आपला पती व्हिक्टर (वय ३०), चिमुकली मुलगी राणी (वय १ वर्ष ८ महिने) व दीर जॉन याच्यासह मुळेगाव तांडय़ावर स्वामी विवेकानंद नगरात राहात असे. किरण ही पहाटे ऑर्केस्ट्रा बार बंद झाल्यानंतर घरी परतली. तिच्यापाठोपाठ उस्मान व त्याचे दोघे साथीदार तिच्या घरात आले. उस्मान याने रीना ऊर्फ किरण हिच्या पतीला-व्हिक्टर यास, किरण हिच्याशी माझे प्रेमसंबंध असून तिला घेऊन मी जाणार आहे, तू अडविले तर तुला खलास करीन, अशी धमकी दिली. त्याचवेळी उस्मान याने व्हिक्टर याच्या तोंडावर रुमाल बांधला, तर किरण व अन्य एका साथीदाराने त्याचे हात पकडले व दुसऱ्याने पाय धरले. तेव्हा उस्मान याने आपल्या कमरेला असलेल्या गुप्तीने व्हिक्टरच्या गळय़ावर गंभीर वार करून त्याचा निर्घृण खून केला. नंतर मृतदेह घराबाहेर नेऊन टाकून घरातील सांडलेले रक्त पुसण्यात आले. मृत व्हिक्टरचा मावसभाऊ जॉन याने दिलेल्या फिर्यादीनुसार सोलापूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फरारी उस्मान व किरण तसेच अन्य दोघा साथीदारांचा शोध पोलीस निरीक्षक शिवप्रकाश यादव हे घेत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jul 2013 रोजी प्रकाशित
पतीचा खून करून बारबाला प्रियकरासह फरारी
राज्यात डान्स बारवर घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवल्याचा मुद्दा सध्या गाजत असताना इकडे सोलापुरात ऑर्केस्ट्रा बारमधील एका बारबालेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना घडली.

First published on: 23-07-2013 at 01:56 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bar girl murdered her husband