कोल्हार भगवतीपूर येथील भगवतीमाता पतसंस्थेवर पडलेल्या दरोडय़ाचे धागेदोरे पोलिसांना लागले आहेत. शहरातील चन्या बेग या गुन्हेगारी टोळीचा त्यात हात असून चार गुन्हेगारांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. टोळीतील अन्य गुन्हेगार फरार होऊ नये म्हणून तपासामध्ये गोपनियता बाळगली जात आहे.
कोल्हार भगवतीपूर येथील भगवतीमाता पतसंस्थेवर दि. १६ रोजी पाच सशस्त्र दरोडेखोरांनी सुमारे ७० लाख रुपयांची भरदिवसा लूट केली होती. पतसंस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून त्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून सोने व रोकड लांबविण्यात आली होती. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज पतसंस्थेस भेट देवून माहिती घेतली होती. पोलीस अधिक्षक रावसाहेब िशदे व अतिरीक्त पोलीस अधिक्षीका सुनिता ठाकरे-साळुंखे यांना दरोडय़ाचा त्वरीत तपास लावावा अशी सूचना केली होती.
आठवडाभरापासून पोलीस सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. दरोडय़ात चन्या बेग टोळीचा हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून टोळीशी संबंधीत असलेल्या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. यात निलंबित करण्यात आलेले पोलीस निरीक्षक जगदीश पाटील यांच्याविरूद्ध तक्रारी करणाऱ्या दोघांचा समावेश आहे. दोघेही चन्या बेगचा भाऊ सागर बेग याचे मित्र आहेत. चन्या बेग हा खतरनाक गुन्हेगार आहे. धूम स्टाईल, दागिने चोरणे, चोऱ्या व दरोडे टाकण्याचे काम तो करतो. शिर्डी येथील खतरनाक गुन्हेगार पाप्या शेख याच्यावर त्याने सुपारी घेवून गोळीबार केला होता. त्याला दहशतवाद विरोधी पथकाने या गुन्ह्यात अटक केली होती. तसेच अटक करण्यास आलेल्या पोलिसालाही त्याने मारहाण केली होती. घोटी, इगतपुरी व नाशिक परिसरात त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत. सध्या त्याचे वास्तव्य शहरात नव्हते. नाशिक येथे राहून तो गुन्हेगारी कारवायांची सूत्रे हालवीत होता.
बेग टोळीतील चौघांना दरोडय़ातील सोने जोपर्यंत हस्तगत केले जात नाही तोपर्यंत त्यांना अटक करण्याचे टाळले आहे. ठोस पुरावे आले तरच त्यांना अटक करण्यात येईल. बेग टोळीच्या सदस्यांना चौकशीसाठी जरी ताब्यात घेण्यात आले असले तरी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी त्याबाबत माहीती देण्यास नकार दिला. अतिरीक्त पोलीस अधिक्षीका सुनिता साळुंके-ठाकरे यांनी तपासात प्रगती आहे पण अधिक सांगता येणार नाही, असे स्पष्ट केले.