कर्जत तालुक्यातील बारडगांव दगडी येथील एकनाथ पाटील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने चालवण्यात आलेल्या चारा डेपोत गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न होत आहे. संबंधितांवर ३० दिवसांच्या आत गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सीआयडीला दिले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा याचिकाकर्ते अनिल शर्मा यांनी ही माहिती दिली.
शर्मा यांना सांगितले, की बारडगांव सुद्रिक येथील एकनाथ पाटील या सेवाभावी संस्थेने चारा डेपो चालवला, मात्र यात मोठा गैरव्यवहार केला. माहितीच्या अधिकारात हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर विरोधी पक्षनेते विनोद तावडे व एकनाथ खडसे यांनी विधिमंडळात त्यावर आवाज उठवला होता. सभागृहातच गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी याची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची घोषणाही केली होती. मात्र चौकशी होऊनही पुढे काहीच कारवाई न झाल्याने तावडे यांनी पुन्हा सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला असता चौकशी सुरू आहे असे उत्तर सरकारने दिले होते.
शर्मा यांनी अखेर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याबाबत याचिका दाखल केली होती. या प्रकरणात सीआयडीने काय चौकशी केली व कारवाई काय केली याचीही माहिती मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने विचारणा केली असता, सीआयडीने न्यायालयात गुरुवारी म्हणणे सादर केले. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. यात तथ्य आढळले असून दोषींवर गुन्हे दाखल करणार आहे, सरकारला तसा अहवाल दिला आहे, असे सीयआयडीच्या वकिलांनी न्यायालयात स्पष्ट केले. यावर न्यायमूर्ती चिमा व न्यायमूर्ती चांदीभार यांनी सीआयडीला ३० दिवसांत दोषींवर गुन्हे दाखल करा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये दोषी आढळलेले सर्व जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यात केवळ संस्थाचालकांचा समावेश आहे, की महसूल विभागाच्या अधिका-यांचा समावेश आहे हे मात्र समजू शकले नाही. या प्रकरणी सरकारने त्या वेळी येथील तत्कालीन तहसीलदार सुरेश थोरात यांची तातडीने बदली केली होती.