हिरव्या दहशतवादाविषयी अवाक्षरही न काढणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भगवा दहशतवाद आणि हिंदू आतंकवाद असे शब्द उच्चारुन देशातील शंभर कोटी हिंदूंचा जाणीवपूर्वक अपमान केला आहेअसे आरोप करत हिंदू जनजागृती समितीतर्फे मंगळवारी (१२ फेब्रुवारी) भगवी निषेध फेरी आयोजित करण्यात आली आहे.
डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून दुपारी चार वाजता ही फेरी निघणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराजवळील झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा येथे या फेरीची सांगता होणार आहे. यामध्ये हिंदूू स्वाभिमान प्रतिष्ठान, अभिनव भारत, हिंदू महासभा, हिंदू राष्ट्रसेना, वारकरी संप्रदाय, सनातन संस्था, बजरंग दल, ओंकार विचार मंच, समर्थ भारत, प्रतापगड उस्तव समिती, समस्त हिंदू आघाडी, श्रीशिव प्रतिष्ठान, धर्मजागरण मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, श्री संप्रदाय, योग वेदान्त समिती, युवा सेवा संघ, शिवसेना, भाजयुमो या संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती समितीचे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.