वांगणी रेल्वे स्थानक परिसरात गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास चक्क भेकराचे पिल्लू जखमी अवस्थेत सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येथील रहिवासी शरिफ बुबेरे आणि चंद्रकांत जाधव यांना स्थानकालगतच्या झुडपात एक हरिणसदृश प्राणी दिसला. जवळून निरीक्षण केले असता तो भेकर असल्याचे आढळून आले. त्यांनी त्याला वांगणी पोलीस चौकीत आणले.  
जखमी अवस्थेत असलेल्या या भेकराला वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. वैद्यकीय उपचार करून त्याला जंगलात सोडून देण्यात येणार आहे. वांगणीलगतच्या कडवपाडा येथील जंगलातील हे भेकर कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे वांगणी स्थानक परिसरात आले असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पूर्वी वांगणी परिसरात हरिण, कोल्हे, ससे, मोर, भेकर असे अनेक प्राणी आढळून येत होते. मात्र जंगलांचा ऱ्हास आणि वाढत्या नागरीकरणामुळे ही प्राणीसंपदा नामशेष झाली.